अख्तर काझी
दौंड : शहरात बेवारस कुत्र्यांच्या झुंडीनी अक्षरशः हैदोस घातल्याचे चित्र आहे. शहरातील भाजी मंडई, चिकन, मटन, मासळी विक्री दुकानांच्या परिसरात तर कुत्र्यांच्या झुंडी च्या झुंडी फिरताना आढळून येत आहेत. अशा दुकानांच्या परिसरातून, या कुत्र्यांच्या तावडीतून जाताना नागरिकांना जीव मुठीत घेऊनच जावे लागत आहे. एका युवकाला या कुत्र्यांनी अचानक हल्ला करून जखमी केल्याची घटना काल घडली आहे.
कचऱ्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर… हे सर्व होत असताना भरीस भर म्हणून की काय सध्या शहरात ठिकठिकाणी कचऱ्यांचे ढीग जमा झाले आहेत. या कचऱ्यामधील टाकाऊ पदार्थ खाण्यासाठी या भटक्या कुत्र्यांच्या टोळक्यांमध्ये मोठी घमासान होताना दिसत आहे. अशावेळी जर या कुत्र्यांना हुसकाविण्यासाठी कोणी गेले तर सर्वच कुत्री त्याच्या अंगावर धावून येताना दिसत आहेत. या सर्व प्रकारामुळे येथील नागरिक मात्र या कुत्र्यांच्या त्रासापासून पुरते हैरान झाले असल्याचे दिसत आहे.
भटक्या कुत्र्यांचा युवकावर हल्ला… दि. 4 ऑक्टोबर रोजी, शहरातील शालिमार चौक ते जय हरी चौक रस्त्याने जाणाऱ्या केदार लेले या युवकावर भटक्या कुत्र्याने हल्ला करीत जखमी केल्याची घटना घडली. केदार याच्या एका पायावर या आधीच उपचार चालू आहेत, आणी आता त्याच्या दुसऱ्या पायाला भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याने त्याच्या पायाला जखमा झाल्या असुन त्यामुळे त्याला चालणे ही मुश्किल झाले आहे.
शहरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे एका मुलाचा गेला होता जीव… शहरात या आधी ही एका घटनेत पिसाळलेल्या कुत्र्याने एका लहान मुलावर हल्ला करीत त्याला जखमी केले होते. उपचारा दरम्यान या मुलाचा मृत्यु झाला होता. शहरात अशा गंभीर घटना घडत असताना नगरपरिषद प्रशासन यावर ठोस उपाय योजना करण्यात असमर्थ ठरत असल्याचा आरोप स्थानिक करीत आहेत. त्यामुळे शहरातील भटक्या, बेवारस कुत्र्यांच्या बंदोबस्ताचा प्रश्न एरणीवर आला आहे.
दौंड नगरपरिषदेने लक्ष घालून उपाययोजना करावी… दौंड नगर परिषदेने अशा घटना गांभीर्याने घेऊन शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी वारंवार करण्यात येत आहे. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे एखादा अनर्थ घटना घडण्याआधी नगरपरिषदेने ठोस उपाय योजना अंमलात आणली पाहिजे अशी अपेक्षा दौंडकरांकडून करण्यात येत आहे.