अब्बास शेख
राजकीय : राज्यातील 2,359 ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले ज्यामध्ये दौंड तालुक्यातील 11 ग्रामपंचायतींचाही समावेश आहे. (सहकारनामा) या 11 ग्रामपंचायतींमध्ये केडगाव, पारगाव, खोपोडी, नायगाव, वाटलूज, मलठण, पांढरेवाडी, कुरकुंभ, वाखारी, पानवली, वडगांव बांडे या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या ग्रामपंचायतींची निवडणूक 5 नोव्हेंबर 2023 ला होत असून निकाल 6 नोव्हेंबर 2023 ला जाहीर होणार आहे.
2024 ला ग्रामपंचायत निवडणुका होतील म्हणून बिनधास्त राहिलेले गाव पुढारी अचानक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने चांगलेच गोंधळून गेले आहेत. त्यामुळे आता गावोगावीच्या नेते मंडळींना आपले गावचे वार्ड आणि कारकर्त्यांची आठवण येऊ लागली आहे. कालपर्यंत ओळख न देणारे गाव पुढारी आज कार्यकर्त्यांना आवाज देऊन चहा पाजताना दिसत आहेत तर काहीजण घरात जेवण करतानाही वार्डवाईज मतदार यादी घेऊन चाचपनी करताना दिसत आहेत.
मात्र कार्यकर्त्यांसह नागरिकांनीही या पुढाऱ्यांना पुरते ओळखले असून त्यांना धडा शिकविण्यासाठी नागरिकांनीच कंबर कसल्याचे ऐकायला मिळत आहे. नागरिकांना हेलपाटे मारायला लावून, मंजुर झालेली कामेसुद्धा न करता फंड माघारी पाठवणाऱ्या बहाद्दरांना येणारी निवडणूक वाटते तितकी सोपी जाणार नाही हे कळून चुकले आहे. त्यामुळे वादग्रत ठरलेली मंडळी आपल्यासोबत फिरवायला नको असा काहीसा सुरु दबक्या आवाजामध्ये आपसातील गटातूनच निघताना दिसत आहे. गावची धुरा आपल्याच खांद्यावर असल्याचा भास झालेल्या काही मंडळींनी आत्तापासूनच गुपचूप पणे एक एकाच्या घरोघरी जाऊन भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. निवडणुकीची तारीख जाहीर होताच छुपा प्रचार सुरु झाला असल्याचे चित्र काल रात्री पासून दिसू लागले आहे.
निवडणूक विशेष सदर, क्रमशः..