केडगाव येथील सुभाष बाबुराव कुल महाविद्यालय व खादी ग्रामोद्योग भवन यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी जयंती कार्यक्रम आयोजित केला होता. याप्रसंगी ज्येष्ठ गांधीवादी नेते प्रा. के.डी. कांचन यांनी महात्मा गांधीजींच्या सहवासात असतानाच्या उरुळी कांचन येथील आठवणींना उजाळा दिला.
प्रार्थना चालू असताना व्हॉइस रॉयचे ब्रिटिश अधिकारी गांधीजींना घेऊन जाण्यास आले असताना ‘मी प्रार्थना झाल्याशिवाय तुमच्यासोबत येणार नाही’ असे त्यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले व दुसऱ्या दिवसाची प्रात: प्रार्थना झाल्यानंतर गांधीजी ब्रिटिश अधिकाऱ्यांसोबत मार्गस्थ झाले. अशा प्रकारच्या अनेक आठवणी के.डी . कांचन यांनी या कार्यक्रम प्रसंगी सांगितल्या. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार जाधव यांनी आजच्या काळामध्ये राष्ट्रीय एकात्मतेसाठी, जागतिक सहजीवनासाठी गांधी विचारांची आवश्यकता असल्याचे सांगितले. आजच्या विस्कळीत समाजजीवन व राजकारणाला योग्य दिशा देण्यासाठी गांधी विचारांची कास धरायला हवी असे प्रतिपादन त्यांनी केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष आनंद थोरात यांनी आजच्या तरुणांच्या स्वप्नांची सांगड गांधीजींच्या स्वप्नांशी जर घातली तर देशाचा विकास विधायक पद्धतीने होऊ शकतो असे मत व्यक्त केले. तसेच हा देश कोणा श्रीमंत व्यक्तीचा नसून तो कायमच गांधीजींचाच असणार आहे असे ठामपणे सांगितले. खादी ग्रामोद्योग भवनचे गणेश ढवळे यांनी खादी चे महत्व विशद करताना खादी देशभक्तीचे प्रतीक असल्याचे सांगितले. जिल्हा परिषद सदस्य श्रीमती सुजाता पवार यांनी महात्मा गांधीजींचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान स्पष्ट केले.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते चरख्यावर सूत कताई करण्यात आली तसेच महात्मा गांधीजींच्या जीवनावर आधारित काही चित्रे प्रदर्शित करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन भानुदास ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या कार्यक्रमाला डॉ. भाऊसाहेब गव्हाणे, डॉ. अनुराधा गुजर, डॉ. अशोक दिवेकर, डॉ. मनीषा जाधव, डॉ. विशाल गायकवाड, अमोल शेलार, डॉ. महादेव थोपटे, प्रियंका थोरात, चैताली दिवेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्याम वासनीकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. शोभा वाईकर यांनी मानले.