ज्यांनी कारखाने खाजगी केले तेच मोर्चा काढून प्रश्न उपस्थित करतात आ. राहुल कुल | मधुकाका यांचा फोटो न छापल्याने मा.आ.रमेश थोरात यांचा कारखान्यावर मोर्चा

पाटस / दौंड : भीमा पाटस कारखान्याची आज दि.29 सप्टेंबर रोजीची 41 वी सर्वसाधारण सभा विविध विषयांनी गाजली. अगोदर दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांनी भीमा पाटस कारखान्यावर दुपारी 12 वाजता निषेध मोर्चा काढला. त्यावेळी त्यांनी भीमा पाटस चेअरमन आ.राहुल कुल व संचालक मंडळावर निशाणा साधला. तर दुपारी एक वाजता सुरु झालेल्या भीमा पाटस च्या सर्वसाधारण सभेत भीमा पाटस चेअरमन आ.राहुल कुल यांनी त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी विविध विषय वाचन करताना किरकोळ गोंधळ उडाला. मात्र चेअरमन राहुल कुल यांनी प्रश्नांना योग्यपद्धतीने उत्तरे दिल्यानंतर हा गोंधळ शमला.

सभेच्या सुरुवातीला कारखान्याचे एम.डी. आबासाहेब निबे यांनी सभेपुढील विषय वाचन करून सभासदांना सभेतील विषय मंजुर आहेत का याबाबत विचारलना केली. यावेळी उपस्थित सभासदांनी आवाजी मतदानाने सर्व विषयांना मंजुरी दिली. तर विषय क्र.10 वर शिवाजी नांदखिले यांनी आक्षेप नोंदवत आपले मत मांडले त्यावेळी चेअरमन राहुल कुल यांनी त्यांना योग्यपद्धतीने उत्तर देत त्यांचे समाधान केले.

सभेच्या सुरुवातीला चेअरमन आ. राहुल कुल यांनी कारखान्याच्या कामकाजाबाबत माहिती दिली. आणि आज झालेल्या मोर्चाबाबत माहिती देताना, ज्यांनी कारखाने खाजगी केले तेच यावर प्रश्न उपस्थित करतात ही शोकांतिका असल्याची टीका केली. 2002 साली कारखाना चालवावा की नाही अशी परिस्थिती असताना पॅनल उभे केले आणि निवडून आलो असे सांगितले आणि जे लोक फोटोचा विषय पुढे करून राजकारण करू पाहत आहेत त्यांनी भीमा पाटस कारखान्यातील देवेंद्र फडणवीस, जेष्ठ नेते शरद पवार दोघांचे फोटो कार्यालयात आजही आहेत ही आमची कृतज्ञता असल्याचे त्यांनी म्हटले.

संजय राऊत यांचे नाव न घेता टीका
कुल यांनी पुढे बोलताना एकजण आले (संजय राऊत) आणि वारेमाप आरोप करून गेले मात्र त्याचा परिणाम मार्केट कमिटी आमच्या ताब्यात आल्याचे सर्वांनी पाहिले. ज्यांनी कारखाना डुबवला त्यांचं कारखाना निवडणूक लढवण्याचं सुद्धा धाडस झालं नाही. बेबी कॅनॉल सुरु केल्याने शेतकऱ्यांची पाण्याची अडचण दूर झाली. काकांच्या बाबतीत कायम आदर राहिला आहे. सत्वाशील भाऊंना कायम सन्मानाची वागणूक दिली आहे आणि त्यांनीही कायम सहकार्य केले आहे.

मधुकाका यांचा फोटो न छापल्याने मा. आमदार रमेश थोरात यांची चेअरमन संचालक मंडळावर टीका

भीमा पाटस चे संस्थापक अध्यक्ष मधुकाका शितोळे यांचा फोटो न छापल्याने माजी आमदार रमेश थोरात यांच्या नेतृत्वाखाली पाटस चौक ते भीमा पाटस कारखाना असा पायी मोर्चा काढण्यात आला. यावेळी भीमा पाटस च्या प्रवेश द्वारावर निषेध सभा घेऊन त्यांनी चेअरमन आणि संचालक मंडळावर टीका केली. मा. आ. रमेश थोरात यांनी बोलताना, संस्थापक अध्यक्ष मधुकाका यांचा चेरमन कुल आणि संचालकांना यांना विसर पडला आहे. त्यांनी या कारखान्यात चुकीच्या पद्धतीने कामकाज केले असल्याची टीका केली.

फोटो का छापला नाही, आ. कुल यांनी दिले उत्तर

अहवालात कुणाचे फोटो छापले कुणाचे नाही यावरून वाद उद्भवत होते. त्यामुळे गेली चार वर्षे कुणाचाच फोटो अहवालात छापला गेला नाही. यामध्ये माजी चेअरमन मधुकाका शितोळे, कै.आमदार सुभाषअण्णा कुल यांसह कुणाचाच फोटो न छापण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे अहवालात कुणाचेच फोटो छापले नव्हते. मात्र सर्वांची इच्छा असेल तर कै.मधुकाका शितोळे आणि कै. आ.सुभाष अण्णा यांचे फोटो छापले जातील आणि त्यांचे पुतळेही कारखान्याच्या आवारात बसवले जातील असे आश्वस्त केले.

कारखान्याला मदत करणाऱ्यांचे आभार

चेरमन आ. राहुल कुल यांनी भीमा पाटस कारखान्याला मदत केल्याबद्दल गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले. तसेच निराणी ग्रुपचे यांचेही आभार मानत या कारखान्याचे टेंडर 3 वेळा निघाले पण अटी किचकट होत्या त्यामुळे कुणी भरत नव्हते. निराणी ग्रुपने दीडशे कोटी भरून ते येथे भाडे तत्वावर आले. त्यामुळे कारखाना सहकारीच राहणार आहे, खाजगी होणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली आणि कारखाना चांगल्या पद्धतीने सुरु आहे. कारखाना जप्त झाला असता तर कुणाचाच फायदा झाला नसता योग्यवेळ आल्यावर बोलेल. सभासदांचे हित जपले जाईल. मागील वर्षी 3 लाख 19 हजार गाळप केले. कारखाना सुजलाम, सुफलाम कारण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. जी मंडळी भाषणे करत आहेत ती कोरोना काळात कुठे होती याचा जाब नागरिकांनी त्यांना विचारले पाहिजे. आपण जवळपास 5 हजार लोकांना मदत केली असे शेवटी त्यांनी सांगितले.

वैशाली नागवडे आणि आ. कुल यांची वादळी चर्चा.. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी वैशाली नागवडे आणि चेरमन आ. राहुल कुल यांच्यामध्ये वाकयुद्ध रंगल्याचे पहायला मिळाले. यावेळी वैशाली नागवडे आणि उपस्थित सभासदांमध्येही काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. हे सर्व सभासद कुल समर्थक असून आपल्याला बोलू देत नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. तर येथे सर्वांना बोलण्याचे स्वातंत्र्य आहे आणि नागवडे ह्या बोलताना त्यांना कोणी टोकू नये अश्या सूचना यावेळी आ. कुल यांनी केल्या.

पांडुरंग मेरगळ, पाराजी हंडाळ यांच्याकडून स्वागत.. दौंड चे धनगर समाजाचे जेष्ठ नेते पांडुरंग मेरगळ तसेच पाराजी हंडाळ यांनी सभेवेळी काही प्रश्न उपस्थित करत कारखान्याचे चेअरमन आणि कारखान्याला मदत करणाऱ्या वरिष्ठ नेत्यांची स्तुती केली. यावेळी ते स्तुतीही करत आहेत आणि प्रश्नही विचारत असल्याने काहीकाळ उपस्थितांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.

भीमा पाटसच्या या 41 व्या सर्वसाधारण सभेला सर्व संचालक मंडळ तसेच कारखान्याचे संचालक आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भीमा पाटस चे संचालक विकास शेलार यांनी केले तर सर्वांचे स्वागत नामदेव बारवकर यांनी केले.