सुधीर गोखले
सांगली : संपूर्ण राज्यातील गणेश भक्तांचे आराध्य दैवत आणि श्री गणपती पंचायतन पैकी एक असलेले तासगाव चा प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणपतीचा आज रथोत्सव सोहळा संपन्न होत आहे. १७७९ मध्ये सुरु झालेल्या या रथोत्सव सोहळ्याचे यंदाचे २४४वे वर्ष आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखोंच्या संख्येने भाविक या सोहळ्यात सहभागी होत असतात.
तासगावचा श्री सिद्धिविनायक हा उजव्या सोंडेचा गणपती गणेश भक्तांचे श्रद्धास्थान राहिला आहे. येथील मंदिराचे वैशिष्ठ म्हणजे या मंदिराला दाक्षिणात्य पद्धतीचे ९६ फुटी सात माजली गोपुर आहे. संपूर्ण बांधकाम चुन्यामधले आहे, सुमारे १७७१ साली सुरु झालेले हे बांधकाम पुण्याच्या देवदेवेश्वर मंदिराच्या धर्तीवर बांधले गेले आहे ते १७७९ मध्ये पूर्ण झाले. मंदिर आणि गोपुर म्हणजे तत्कालीन स्थापत्य शैलीचा एक उत्तम नमुना आहे.
खास परदेशी पर्यटकही या मंदिराला भेट देत असतात. १७७९ सालीचा या रथोत्सवाची सुरुवात झाली. भक्त मंडळी हाताने हा रथ ओढत काशी विश्वेश्वर मंदिरात जातात. आज श्रींची आणि काशी विश्वेश्वर यांची भेट होते. हा रथ संपूर्ण लाकडातील असून तीन मजली असलेल्या या रथाला सुंदर असे कोरीव काम केलेलं आहे. मराठा राज्याचे शेवटचे सरसेनापती परशुरामभाऊ पटवर्धन हे मुळात निस्सीम गणेश भक्त त्यांच्याकडे तासगाव ची जहागिरी आल्यावर त्यांनी या मंदिर बांधकामाचा संकल्प सोडला. या रथोत्सवात सध्याचे पटवर्धन घराण्यातील वंशज यांच्याशिवाय या रथोत्सवाचे मानकरी विराजमान होतात.
लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करायला सुरु करायच्या आधीचीही हि सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा तासगाव गावाने अबाधित ठेवली आहे. हजारो भाविक आपल्या हाताने हा रथ ओढतात. एका समाजभावनेने सरसेनापती परशुरामभाऊंनी हा रथोत्सव सुरु केला सर्वधर्म समभाव या रथोत्सवात दिसून येतो. या रथोत्सवाची सांगता झाल्यावर तासगाव संस्थानच्या श्री गणेशाचे विसर्जन होते. आज मंदिराला आणि गोपुरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे.