सुधीर गोखले
सांगली : बाप्पाचे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. सर्वत्र बाजारपेठा गणेश भक्तांच्या खरेदीसाठी वाट बघत असतानाच महागाईची झळ बाप्पाच्या नैवेद्यालाही बसल्याचे दिसून येत आहे. बाप्पाच्या मोदकापासून ते विविध प्रकारच्या मिठाया जवळपास वीस ते पंचवीस टक्क्यांनी महागल्या आहेत.
यामध्ये काही मिठाई दुकाने वगळता बऱ्याच ठिकाणी दारांवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. मोदकांसाठी लागणारा खवा आणि गुलकंद महागल्याने हि दरवाढ झाल्याचे चित्र आहे तर दूध दरवाढीचा फटका यंदा मिठाई निर्मितीला बसला असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. सांगली मिरजेतील प्रामुख्याने अनेक दशकांपासून असलेली मिठाई दुकाने लांजेकर, कंदी यासारखे मिठाई व्यावसायिकांनी आपली दरवाढ केली आहे.
या विविध मिठाई बरोबरच सध्या बुंदीच्या लाडू ना ग्राहकांची पसंती दिसून येतेय. पण यासाठी लागणाऱ्या डाळीचे दर गगनाला भिडल्याने बबुंदीच्या लाडूंचे दरही वाढले आहेत.
‘बसाप्पा हलवाई’ चे दर मात्र जैसे थे
पश्चिम महाराष्ट्र तसेच कर्नाटकात आपल्या विविध प्रकारच्या मिठाईसाठी विशेषतः पेढ्यासाठी प्रसिद्ध असलेले बसाप्पा हलवाई या प्रसिद्ध मिठाई उत्पादक दुकानाचे संचालक मयूर चौगुले आणि नितीन चौगुले यांच्याशी ‘सहकारनामा’ ने संपर्क साधला असता त्यांनी जरी बाजारपेठेत महागाई वाढली असली तरी मात्र आमच्या ग्राहकांसाठी आम्ही सध्या कोणतीही दरवाढ केली नसल्याचे स्पष्ट केले मात्र गणपती उत्सवानंतर मात्र कदाचित नाईलाज म्हणून थोडी दरवाढ केली जाऊ शकते असेही त्यांनी सांगितले. कारण सध्या सर्व डाळींचे, खव्याचे दर वाढले आहेत. आमच्याकडे गणपती निमित्त तब्बल २४ विविध प्रकारचे मोदक आम्ही आमच्या ग्राहकांसाठी उपलब्ध केले असून खास शुगर असलेल्या ग्राहकांसाठी शुगर फ्री मिठाई सुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहे असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.