कुरकुंभ प्रतिनिधी : दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसी (MIDC) येथे सुगंधी द्रव्य तयार करणाऱ्या हार्मोनी ऑरगॅनिक्स या कंपनीमध्ये अतिशय महागडे द्रव्य (उत्प्रेरक) चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे मात्र तिजोरी न उघडल्याने चोरट्यांचा हा प्रयत्न फसला आहे. याबाबत कंपनीचे मॅनेजर दीपक मोतीराम चौधरी (मॅनेजर हार्माेनी ऑर्गेनिक्स प्रा. लि. कुरकुंभ ता. दौंड जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हार्मोनी ऑरगॅनिक्स या कंपनीमध्ये सुगंधी द्रव्य निर्मती केली जाते. त्या प्रक्रियेसाठी अतिशय महागडी उत्प्रेरके वापरली जातात. अतिशय किंमती असल्याकारणाने हि उत्प्रेरके तिजोरीत सुरक्षितरित्या जतन करून ठेवली जातात. दिनांक 9 सप्टेंबर रोजी रात्री कंपनी बंद झाल्यावर सकाळी 10 सप्टेंबर रोजी सकाळी 7 च्या दरम्यान हि उत्प्रेरके अज्ञात चोरट्यांकडून चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तिजोरी उघडण्यात यश न आल्याने चोरट्यांचा हा प्रयत्न फसला.
हि संपूर्ण घटना हार्मोनी कंपनीमधील कर्मचारी रामचंद्र मगदुम हे इंजिनिअरींग स्टोअर विभागाच्या शटरच्या आतील जाळीचा दरवाजा उघडून आत गेले असता त्यांना समजली. त्यांना तिजोरीच्या बाहेरील जाळीचा दरवाचा उघडा दिसला. तसेच कुलूप आणि तिजोरीचा हॅंडल खाली पडल्याचा व केबीन मधील कॉम्प्युटर आणि इतर साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे दिसले त्यावरून येथे चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
या संपूर्ण घटनेची खबर कंपनीचे मॅनेजर दीपक चौधरी यांना मिळाल्यानंतर त्यांनी याची खबर कंपनीचे मालक आणि इतर पदाधिकाऱ्यांना दिली. तसेच घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्यांना तिजोरीचे बाहेरील लोखंडी जाळीचे दरवाजाचे कुलूप तुटून ते खाली पडलेले दिसुन आले. यावेळी जाळीच्या आतमध्ये असणारी गोदरेज कंपनीची हिरव्या रंगाची तिजोरी व तिच्यामध्ये ठेवण्यात आलेले महागड्या किंमतीचे पॅलेडियम कॅटेलिस्ट हे (उत्प्ररेक) हे तिजोरी उघडल्यानंतर सुरक्षित स्थितीत त्यांना आढळले.
या संपूर्ण घटनेची फिर्याद कंपनीचे मॅनेजर दीपक चौधरी यांनी दौंड पोलीस ठाण्यात दिली असून दौंड पोलीस अधिक तपास करीत आहेत.