मराठा आरक्षण | ‘त्या’ मागण्या मान्य, जरांगे पाटलांनी उपोषण मागे घ्यावे – मुख्यमंत्री

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यात राज्यातील सर्व पक्ष एक आहेत, आणि त्यादृष्टीने ठोस पाउले टाकण्यात येत आहेत. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावे अशी विनंती सर्व पक्षांच्या प्रतिनिधींनी केली असल्याबाबतची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

उपोषणाच्या वेळी परिस्थिती योग्य पध्दतीने न हाताळल्याबद्दल संबंधित उपविभागीय अधिकारी आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्यावर कार्यवाही करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले. याबाबत सविस्तर माहिती देताना, आंदोलनादरम्यान नागरिकांवर झालेले गुन्हे तत्काळ मागे घेण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. मराठा आरक्षणासाठी सरकार गांभीर्याने प्रयत्न करत आहे. काहीतरी थातुरमातुर न करता न्यायालयात टिकणारे आरक्षण कसे देता येईल हे पाहिले जाईल. हे आरक्षण देताना इतर समाजावरही अन्याय होऊ देणार नाही असे मत यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

मनोज जरांगे पाटील यांनी अन्नत्याग सोबत पाणी आणि सलाईन लावण्यास प्रतिबंध केल्याने त्यांची प्रकृती खालवली आहे. उपोषणास्थळी अंतरवाली सराटी येथील महिला येऊन रडत असल्याने तेथील वातावरण भावनिक बनले आहे. जरांगे पाटलांनी डॉक्टरांना तपासणी करू द्यावी, सलाईन लावावे अशी विनवणी येथील महिला त्यांना करताना दिसत आहे.