मराठा समाजातील आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याचा दौंडमध्ये निषेध

अख्तर काझी

दौंड : जालना जिल्ह्यातील सराटी येथे मराठा आरक्षणासाठी लोकशाही मार्गाने व शांततेने आंदोलन करणाऱ्या मराठा समाजातील आंदोलनकर्त्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याचा दौंड शहर व तालुका अखिल भारतीय मराठा महासंघाने निषेध नोंदविला. तसेच सदरचा आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यास तत्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.

येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये झालेल्या आंदोलनावेळी मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी या हल्ल्याचा व राज्य सरकारचा तीव्र निषेध नोंदविला. तहसीलदार, दौंड व दौंड पोलीस प्रशासनाला याबाबतचे निवेदन देण्यात आले.
निवेदनामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, मराठा समाज गेली 40 वर्ष आरक्षणासाठी सातत्याने मागणी करत आहे. आज पर्यंत मराठा समाजाने आरक्षणासाठी लाखोंच्या संख्येने ,शांततेने मोर्चे काढले याची दखल जगभरात घेण्यात आली. समाजातील 80% घटक हा शिक्षण, नोकरी व व्यवसायापासून वंचित आहे. आणि म्हणूनच मराठा समाजाच्या वतीने आरक्षणाची मागणी होत आहे. याच संदर्भात जालना जिल्ह्यातील सराटी येथे मराठा समाजातील कार्यकर्ते शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना त्यांच्यावर अमानुषपणे लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेमुळे मराठा समाजाच्या भावना मोठ्या प्रमाणात दुखावल्या आहेत. त्यामुळे लाठी हल्ल्याचा आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यास त्वरित निलंबित करावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

तसेच मराठा समाजास आरक्षण मिळण्यासाठी कार्यवाही करावी अन्यथा महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाज आक्रमक होऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन करतील असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. दौंड चे उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव यांनी निवेदन स्वीकारले, दौंड चे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील उपस्थित होते.