औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतर प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

पुणे : राज्यसरकारकडून औरंगाबाद आणि उस्मानबाद शहरांच्या नावांचे नामांतर करण्यात आल्याचे जाहीर करण्यात येऊन औरंगबादचे नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्याचा निर्णय त्यावेळी राज्य सरकारने घेतला होता.

मात्र या निर्णयाला विरोध झाल्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. यावर आज मुंबई उच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय देत सध्यातरी जिल्हा आणि तालुका पातळीवर औरंगाबाद आणि उस्मानाबाद हीच नावे राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
मिळत असलेल्या माहितीनुसार औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराच्या नामांतराचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. परंतु तालुका आणि जिल्हा पातळीवर कोणताही बदल झाला नाही अशी भूमिका राज्य सरकारने घेतली. या प्रकरणी सरकारने अद्याप अंतिम निर्णय घेतला नसल्यामुळे आव्हान देणारी याचिका न्यायालयाने निकाली काढली आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, सध्यातरी तालुका आणि जिल्हा पातळीवर नवीन नावे वापरणार नाही अशी राज्य सरकारने उच्च न्यायालयात हमी दिली आहे.

आता औरंगाबाद शहर आणि उस्मानाबाद शहराच्या नामांतराला आव्हान देणार्‍या याचिकांवर ४ ऑक्टोबरला अंतिम सुनावणी होणार आहे. तसेच जेव्हा शासन आदेश निघेल त्यावेळी याचिकाकर्त्यांना नव्याने याचिका दाखल करण्यासही न्यायालयाने परवानगी दिली आहे.