दौंड पोलीस स्टेशन जवळच ‘राजकीय नेत्यांमध्ये’ मोठी हाणामारी ! सहाजणांवर कलम 307 नुसार गुन्हा दाखल

दौंड : दौंड शहरामध्ये मारहाणीचे पेव फुटले आहे. किरकोळ वादातून मारहानीच्या घटना घडू लागल्या आहेत. यामध्ये आता राजकीय पक्षांतील नावाजलेली नेतेमंडळीही ओढली जात असल्याचे दिसत आहे. अशीच एक घटना दौंड पोलीस स्टेशन जवळ घडली असून यात राजकीय पदाधिकारी असणारे अश्विन वाघमारे आणि प्रकाश भालेराव यांच्यासह सहा जणांवर कलम 307 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन्ही गटातील लोकांनी परस्पर विरोधी फिर्याद तक्रार दिली असून ज्यामध्ये पहिली फिर्याद ही अक्षय अशोक काळे, (वय 27 वर्षे, व्यवसाय मजुरी रा. सिध्दार्थनगर, दौड ता. दौंड जि. पुणे) यांनी दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दि. 29/08/2023 रोजी सकाळी 7.00 च्या सुमारास फिर्यादी व त्यांचा मित्र त्यागी रणदिवे हे सविधान चौक, दौंड येथे असलेल्या कल्पलता हॉटेल मधून चहा पिवून बाहेर पडत असताना तेथे अश्विन वाघमारे त्यांचा मित्र राहुल नायडू व एक अनोळखी इसम यांच्यासह आमच्या दोघाजवळ आला आणि मी दौंडमधील वंचित बहुजन आघाडीचा तालुका अध्यक्ष असून तुम्ही दोघे माझ्या नेहमी नादी लागतात असे म्हणत शिवीगाळ दमदाटी केली.

यानंतर अश्विन वाघमारे याने त्याच्या उजव्या हातात असलेला पाइप ने फिर्यादीच्या डाव्या कानावर व डोक्याच्या मागिल बाजूस तीन चार वेळा जोराचे फटके मारले. त्यावेळी फिर्यादीचा मित्र त्यागी रणदिवे हा भांडणे सोडविण्याकरीता मध्ये पडला असता राहुल नायडू याने त्याच्याकडे असलेला चाकु हा त्यागी रणदिवे यास मारण्यासाठी बाहेर काढला त्यामुळे तो तेथून पळून गेला असल्याचे फिर्यादित म्हटले आहे.

तर वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष आश्विन वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दि. 29/08/2023 रोजी सकाळी 6.30 च्या सुमारास मी जिमला जात असताना सविधान चौक, दौंड येथील कल्पलता हॉटेल येथे चहा पिण्यास थांबलो होतो. त्यावेळी त्यागी रणदिवे, गौरव काळे व प्रकाश भालेराव माझ्याजवळ आले व माझ्याशी विनाकारण वाद घालू लागले. तु खुप समाजसेवा करू लागला आहेत तुझ्यामुळे आम्हाला त्रास होत आहे तु पुन्हा आमच्या वाटे गेलास तर तुला आम्ही सोडणार नाही असे म्हणून त्यागी रणदिवे याने मला धक्काबुक्की करण्यास सुरवात केली. त्यावेळी मी त्याला माझी तुम्हा तिघांशी भांडणे करण्याची काहीएक इच्छा नाही मी इथून निघून जातो असे म्हणालो.

मात्र त्यागी रणदिवे यांच्या सोबत गौरव काळे, प्रकाश भालेराव यांनी मला शिवीगाळ दमदाटी करून त्यागी रणदिवे याने त्याच्याकडे असलेला कोयता काढून माझ्यावर उगारला त्यावेळी मी घाबरून जावून खाली वाकलो असता तो कोयता माझ्या मानेस उजव्या बाजूस घासून गेला. त्यानतंर मी तेथून पळून गेलो व दौंड पोलिस स्टेशन येथे येवून घडली हकीकत दौंड ठाणे पोलिस अमलदार यांना सांगितली असे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे.

इतक्या सकाळी दौंड पोलीस स्टेशनजवळ घडलेल्या या घटनेमुळे दौंड शहरात आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून ज्या हॉटेल समोर हा प्रकार घडला तेथील आणि आसपासचे सिसिटीव्ही फुटेज तपासून या मारहाणीत अजून कोण कोण सामील आहे हे पहावे जेणेकरून याची गंभीरता नक्कीच समोर येईल अशी चर्चा दौंडमध्ये सुरु आहे. दौंड पोलिसांनी दोन्हीकडील सहा जणांवर कलम 307 नुसार गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे.