नवी दिल्ली : आज बुधवारी अविश्वास प्रस्तावाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेस खासदार राहुल गांधी हे सभागृहात चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. राहुल गांधी यांनी आपल्या अर्ध्या तासाच्या भाषणात मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला, मोदी सरकारने मणिपूरमध्ये भारताच्या नीतीमुल्यांची हत्या केली, ही भारतमातेची हत्या असून जसा रावण फक्त दोनच लोकांचे ऐकत होता तसे मोदी हे शहा आणि अदानी या दोघांचेच ऐकत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. राहुल यांच्या आरोपांवरुन सभागृहात प्रचंड गदारोळ झाला.
यावेळी स्मृती इराणी यांनीही राहुल गांधी यांच्यावर टीका केली तसेच ज्यांना सभागृहात म्हणणे मांडण्याचा अधिकार देण्यात आला, त्यांनी तेथून निघताना फ्लाईंग किस देऊन अशोभनीय वर्तन केले. महिला खासदार सभागृहात बसलेल्या असताना राहुल गांधी यांनी हे अशोभनीय वर्तन केले असा आरोप त्यांनी केला. आणि स्मृती इराणी यांनी हल्लाबोल करत म्हटले की, ही त्या कुटुंबाची संस्कृती दर्शवते, जी आज देशानेही पाहिली आहे. इराणी यांच्या आरोपानंतर सभागृहात पुन्हा गदारोळ झाला. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या वतीने राहुल गांधी यांच्याविरोधात 22 महिला खासदारांनी तक्रार दाखल केली.