सातारा : ‘आवड निर्माण होण्यासाठी आणि पालकांचाही आर्थिक भार थोडा का होईना कमी होण्यासाठी जिल्ह्यातील नगरपालिका शाळांमधील सुमारे १२ हजार मुलांना सुमारे ४५ हजार वह्यांचे वाटप करण्यात आले आहे,’ असे खासदार उदयनराजे भोसले यांनी
सांगितले.
जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील बारा हजार विद्यार्थ्यांना सुमारे ४५ हजार वह्यांचे वाटप खा छ. उदयनराजे यांच्या प्रयत्नातून करण्यात आले. नुकत्याच साताऱ्यात झालेल्या दोन छत्रपतींमधील राड्यानंतर हा एक स्तुत्य उपक्रम खा उदयन राजेंनी घेतल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या तर पालक वर्गामधून समाधान व्यक्त होत आहे. खा छत्रपती उदयनराजे भोसले मित्र परिवाराच्या वतीने हा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमामध्ये सातारा, कराड, वाई, महाबळेश्वर, पाचगणी, फलटण नगरपालिकांच्या शिक्षण मंडळांकडे विद्यार्थी पटसंख्येनुसार वह्या प्रदान करण्यात आल्या. याप्रसंगी मुख्याध्यापक, शिक्षक, उदयनराजे भोसले मित्रसमूहाचे सदस्य, पदाधिकारी या वेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुनील काटकर, विनीत पाटील, माजी नगरसेवक बाळासाहेब राक्षे, विजय नायकवडी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.