दौंड : केडगाव येथील एक हसतमुख तरुण, कायम नवीन काहीतरी करायचे या जिद्दीने नवनवीन उपक्रम राबविण्याकडे कल असलेला युवक प्रज्वल शेळके याचा अपघाती मृत्यू झाला आहे. दौंड तालुका खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन संतोष उर्फ महेंद्र शेळके यांचा मुलगा प्रज्वल शेळके याचा दि. 20 जून रोजी यवत येथील महामार्गावर अपघात घडला त्यामध्ये प्रज्वल हा गंभीर जखमी झाला मात्र तरीही त्याने मृत्यूशी शेवटपर्यंत लढा दिला. त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे त्यास यवत ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून लोणी काळभोर येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. यावेळी त्यास वाचविण्यासाठी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले मात्र त्याची मृत्यूशी असलेली झुंज अपयशी ठरली.
यवत येथे दुचाकीवर जात असलेल्या प्रज्वल शेळके आणि अचानक महामार्ग ओलांडणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीचा अपघात झाला. या अपघातामध्ये तो अज्ञात व्यक्ती जागीच मृत्युमुखी पडला तर प्रज्वल शेळके याला यात गंभीर मार लागला. प्रज्वल सोबत असणारा विवेक बारवकर हाही या अपघातामध्ये जखमी झाला मात्र त्यास गंभीर दुखापत झाली नसल्याने यवत येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले तर प्रज्वल याला अगोदर यवत ग्रामीण रुग्णालय आणि नंतर त्यास लोणीकाळभोर येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले होते मात्र डोक्याला जास्त इजा होऊन अधिक रक्तस्त्राव झाल्याने अखेर त्याची प्राणज्योत मालवली.
प्रज्वल शेळके याच्या हसमुख स्वभावाने त्याने मोठा मित्र परिवार कमावला होता. त्याच्या अपघाताची बातमी केडगावमध्ये समजताच अनेकांनी दवाखण्याकडे धाव घेत एकच गर्दी केली होती. त्याच्या मृत्यूच्या खबरीने मात्र केडगाव, 22 फाटा, सोडनवर वस्तीवर शोककळा पसरली आहे.