दौंड :
यवत पोलीस स्टेशन हद्दीत असणाऱ्या वाखारी गावाजवळ एक कंटेनर पलटी होऊन भीषण अपघात झाला. ही घटना दि.07 जून रोजी रात्री 08ः30 वाजण्याच्या सुमारास घडली असून या कंटेनर मध्ये असणाऱ्या चार जणांपैकी एक महिला आणि दोन वर्षांचे बाळ आश्चर्यकारकरीत्या बचावले आहे. तर कंटेनर चालक आणि किरण कांबळे (रा.यवत ता.दौंड) हे दोनजण किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघाताबाबत तात्यासाहेब अंकुश करे, (पो.काॅ.ब.नं.2940, यवत पोलीस स्टेशन) यांनी फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीनुसार कंटेनर चालक दिपक आादिनाथ शिरढोणे (रा.अकलुज ता.माळशिरस जि.सोलापुर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितनुसार कंटेनर चालक दिपक आदिनाथ शिरढोणे हा कंटेनर (क्र. एच.आर.55/एम.एम/1873) घेऊन पुणे बाजूकडून सोलापुर बाजुकडे चालवित घेवुन जात असताना त्याचा कंन्टेनर गाडीवरील ताबा सुटला. चालक हा दारूच्या नशेत होता तसेच तो ते वाहन सुसाट वेगात, हयगईने चालवत असल्याने कंटेनर पुणे सोलापुर हायवे रोडवर वाखारी गावाजवळ येताच रस्त्याच्या साइडला जाऊन पलटी झाला. यावेळी य कंटेनरमध्ये कांबळे हा तरुण, त्याची पत्नी व त्यांचे दोन वर्षांचे बाळ व कंटेनर चालक असे चौघेजण होते. कंटेनर पलटी झाल्यानंतर यातील महिला व तिचे बाळ आश्चर्यकारक बचावले तर कंटेनर चालक व कांबळे हा तरुण किरकोळ जखमी झाला आहे.
अपघातानंतर कंटेनर ची अवस्था पाहता यात कोणी वाचले असेल यावर कोणाचा विश्वास बसत नव्हता. मात्र या अपघातात पती,पत्नी व त्यांचे दोन वर्षाचे बाळ आश्चर्यकारकरित्या बचावले आहे. यवत पोलिसांनी कंटेनर चालक दिपक आादिनाथ शिरढोणे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस नाईक इंगवले करीत आहेत.