अख्तर काझी
दौंड : रयतेचे राजे, भारतीयांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा राज्याभिषेक सोहळा दौंड मध्ये मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. या निमित्ताने येथील शिवाजी महाराज स्मारक येथे आमदार राहुल कुल यांच्या हस्ते अभिषेक व आरती करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे, मुख्यमंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे, मा. नगराध्यक्ष वीरधवल जगदाळे, योगेश कटारिया तसेच पुणे शिवसेना प्रमुख गीतांजली ढोणे, शिवस्मारक समिती- मराठा महासंघाचे सर्व पदाधिकारी व शिवप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते.
शिवराज्याभिषेकाच्या निमित्ताने येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकास आकर्षक सजावट करण्यात आली होती. सोहळ्यास उपस्थित शिवप्रेमींनी महाराजांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाने येथील कटारिया महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. पथनाट्याच्या माध्यमातून छत्रपतींना जी विशेषणे लावली जातात त्यांचा अर्थ जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या वतीने महाराजांच्या जय जयकारा समवेत प्लास्टिक पुनर्वापर करणे व वृक्ष संवर्धनाच्या घोषणा देत पर्यावरण पूरक संदेश प्रसारित शहरातून रॅली काढण्यात आली.
भगवे वादळ ग्रुपचे अमोल जगताप, रोहन घोरपडे ,किरण खडके,बाबा हातागळे, योगेश गायकवाड, सोनू बलाड्डे, अनिकेत राजे आदींनी शिवराज्याभिषेक सोहळ्याचे उत्तमरीत्या आयोजन केले.