अख्तर काझी
दौंड शहर : चित्त थरारक खेळ व आपल्याकडील जादू कलेमुळे शहर व पंचक्रोशीत नावाजलेले दौंडचे कलाकार गोविंद दशरथ कांबळे यांचा अपघाती मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,दि.1 जून रोजी दुपारी 2 च्या सुमारास गोविंद कांबळे आपल्या पत्नीसह दुचाकीवर दौंडहुन बारामतीला जात होते. त्याचवेळी जिरेगाव हद्दीत पाठीमागून आलेल्या टेम्पो ने कांबळे यांच्या दुचाकीस कट मारला ज्यामुळे टेम्पोच्या पाठीमागील बाजूची दुचाकीला धडक बसली. या धडकेमुळे गोविंद कांबळे व पत्नी दुचाकीवरून रस्त्यावर पडले.
अपघातामध्ये कांबळे यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली, व शरीरावर इतर ठिकाणीही मुक्का मार लागला. घटनास्थळी जमलेले स्थानिक नागरिक व नातलगांच्या मदतीने जखमी कांबळे यांना उपचारासाठी दौंड येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. परंतु कांबळे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दौंड पोलिसांनी टेम्पो वरील चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.