सुधीर गोखले
सांगली (मिरज) : मिरज मालगाव रस्त्यावर खोतनगर परिसरातील सार्वजनिक रस्त्यावर मिरज सुधार समितीच्या तक्रारीवरून महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे पथक या अतिक्रमणाची पाहणी करण्यासाठी व निर्मूलनासाठी घटनास्थळी दाखल झाले.
तर त्याचदरम्यान पथकासमोर एका वृद्ध महिलेने अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतले याप्रकरणी संबंधित महिलेसह अन्य दोघांवर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर हकीकत अशी कि, खोतनगर गल्ली क्रमांक ४ येथे सुमन वाघमारे आणि सुरेश वाघमारे यांनी सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण करून रस्ताच बंद केल्याची तक्रार करण्यात आली होती. हे अतिक्रमण हटवण्यासाठी मिरज सुधार समितीने आंदोलनाचा इशारा दिल्याने सहायक आयुक्त आणि अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख अशोक कुंभार हे घटनास्थळी आपल्या पथकासह दाखल झाले.
पण या पथकासमोरच सुमन वाघमारे आणि सुरेश वाघमारे यांनी शिवीगाळ सुरू केली असल्याचे फिर्यादीत म्हटले असून सुमन वाघमारे यांनी आपल्या अंगावर पेट्रोल ओतून घेऊन पेटवून घेतले. यावेळी महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी समयसूचकता दाखवत तातडीने सुमन वाघमारे यांच्या अंगावर पाणी टाकून आग विझवली त्यात वाघमारे या २५ टक्के भाजल्या असून त्यांना तातडीने सिव्हिल हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अचानक घडलेल्या घटनेमुळे महापालिका कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली कोणतीही कारवाई न करता हे पथक परत निघून गेले. सहायक आयुक्त अशोक कुंभार यांनी शहर पोलीस ठाण्यात सुमन वाघमारे आणि सुरेश वाघमारे यांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याची फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.