विकास शेळके
खुटबाव : दौंड तालुक्यातील खुटबाव गावात बिबट्याचा मुक्त वावर वाढला आहे. बिबट्याच्या होत असलेल्या या मुक्त वावरामुळे खुटबाव गावातील शेतकरी मात्र दहशतीखाली जगू लागला आहे.
वनविभागाने तातडीने खुटबाव गावातील परिसरामध्ये पिंजरा लावून या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत असून गावामध्ये लहान मुले, स्त्रिया आणि वयस्क व्यक्तींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील मुख्य पीक ऊस शेती असून रात्रीच्यावेळी शेतीला पाणी देण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये कमालीची दहशत पहायला मिळत आहे. शेतीला पुरविण्यात येणारी लाईट ही रात्रीच्या वेळी येत असल्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीच शेतात पाणी देण्यासाठी लागते. परंतु बिबट्याच्या दहशतीने येथील शेतकरी रात्री च्या वेळी शेतात जाणे टाळत आहेत त्यामुळे त्यांची उभी पिके जळून जात असल्याची माहिती येथील शेतकरी महेश थोरात यांनी दिली आहे.
काल रात्री महेश थोरात या शेतकऱ्याच्या शेतामध्ये बिबट्याचे दर्शन झाले असून बबन करे या मेंढपाळाच्या मेंढ्यांवर बिबट्याने हल्ला करून काही मेंढ्या जखमी केल्याची घटना घडली आहे. बबन करे यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या पळून गेल्याने पुढील अनर्थ टळला आहे. त्यामुळे वनविभागाने तातडीने याठिकाणी पिंजरा लावून बिबट्याला पकडावे अशी मागणी होत आहे.