अहमदनगर : गांजा तस्करी करणाऱ्या दोघांना कोतवाली पोलीसांनी जेरबंद केले असून त्यांच्याकडून सुमारे ३६ हजार रुपयांचा गांजा माल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक २९/०५/२०२३ रोजी कोतवाली पोलीसांना माळीवाडा बसस्थानक परिसरात काही इसम त्यांचे मोटारसायकलवरुन गांजा सारखा अंमली पदार्थ विक्री करीता घेवुन येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिसांनी माळीवाडा बसस्थानक परिसरात सापळा लावला असता काही वेळातच तेथे एका दुचाकी वाहनावरुन दोन इसम आले. मात्र त्यांनी पोलीसांना पाहून सदर ठिकाणावरुन पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांनी त्यांना जागीच ताब्यात घेवून त्यांच्याकडील बॅगची पाहणी केली असता त्यांच्या बॅगमध्ये अंमली पदार्थ गांजा असल्याचे निदर्शनास आले.
सदर आरोपींना ताब्यात घेवुन त्यांना त्यांची विचारली असता १) सुनिल राम पवार (वय २२ वर्षे, रा. चिचोली फाटा ता राहुरी जि अहमदनगर) २) अशोक उत्तम फुलमाळी (वय २१ वर्षे रा.शास्त्रीनगर चांदा, ता. नेवासा जि अहमदनगर) असे असल्याचे सांगीतले. त्यांच्या ताब्यात काळपट, हिरवट रंगाची पाने, फुले काडया व बिया असलेले केनाबीस या वनस्पतीचे शेंडे म्हणजे गांजा हा २ किलो २६ ग्रॅम व एक दुचाकी मोटारसायकल असे एकून ३६,७८५/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोहेकॉ तनवीर महंमदअली शेख यांच्या फिर्यादीवरुन आरोपीविरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये अंमली औषधे द्रव्य मन प्रभावी पदार्थ अधिनियम सन १९८५ चे कलम ८(क) सह २०(ब) (२) (क), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्हयाचा अधिक तपास पोनि चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई मनोज कचरे हे करीत आहेत.