दौंड : दौंड तालुक्यातील रावणगाव येथील घाट संपल्यानंतर बोरिबेल हद्दीत एका दाम्पत्याला कोयत्याचा धाक दाखवून सुमारे १ लाख ६१ हजारांचे दागिने, रोकड आणि मोबाईल लुटून नेल्याची घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना पुरंदर तालुक्यातील चिव्हेवाडी येथे घडली होती. या दोन्ही घटनांनी पुणे जिल्ह्यातील ग्रामिण भागामध्ये रात्रीचा प्रवास करणाऱ्या दाम्पत्यांमध्ये कमालीची भीती निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ज्ञानदेव दत्तात्रय धगाटे (रा.मलठण ता.दौंड, पुणे) हे दि.२७ मे रोजी रात्री ११:०० वाजण्याच्या सुमारास बोरिबेलकडे जात असताना रावणगाव येथील घाट संपल्यावर बोरीबेल गावच्या हद्दीमध्ये तीन अज्ञात इसमांनी फिर्यादी ज्ञानदेव धगाटे व त्यांच्या पत्नीस कोयत्याचा धाक दाखवुन त्यांच्या जवळील ७५ हजारांचे दिड तोळा वजनाचे मंगळसुत्र, ७५ हजारांचे दिड तोळा वजनाचे सोन्याचे कानातील वेल, फुले व झुबे तसेच ९ हजार रुपयांचा एम.आय. रेडमी कंपनीचा मोबाईल, २ हजार रुपयांची रोख रक्कम, आधारकार्ड, पॅनकार्ड असा एकुण
१ लाख ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल जबरीने चोरुन नेला आहे.
वरील घटना घडल्यानंतर ज्ञानेश्वर धगाटे यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दौंड पोलीस ठाण्याचे पोसई गोसावी हे अधिक तपास करीत आहेत.