दौंड | कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी गणेश जगदाळे तर उपसभापतीपदी शरद कोळपे यांची निवड

दौंड : दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी आमदार राहुल कुल यांचे विश्वासू सहकारी गणेश जगदाळे तर उपसभापतीपदी शरद कोळपे यांची निवड झाली आहे.

दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप कुल गट 9 तर राष्ट्रवादी थोरात गटाला 9 जागा मिळाल्या होत्या. दोन्ही बाजूंनी समान संचालक निवडून आल्याने सभापतिपदी कोणाची निवड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र माजी आमदार रमेश थोरात यांचे विश्वासू सहकारी दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालक संपतराव निंबाळकर यांचे आकस्मिक निधन झाल्यानंतर कुल गट 9 तर थोरात गट 8 असे संचालकांचे संख्याबळ झाले. त्यामुळे दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीवर यावेळी आमदार राहुल कुल (भाजप) यांची सत्ता येणार हे जवळपास निश्चित झाले होते.

आज दि.25 मे रोजी कुल गट (भाजप) – थोरात गट (राष्ट्रवादी) अश्या दोन्ही बाजूंनी सभापती, उपसभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. कुल गटाकडून (भाजप) गणेश जगदाळे, शरद कोळपे यांनी तर थोरात गटाकडून (राष्ट्रवादी) शिंदे, मोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यामध्ये कुल गटाचे जगदाळे, कोळपे हे निवडून आले. सभापती,उपसभापती पदाची निवडणूक पार पडल्यानंतर दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी प्रभागातील सदस्य संपतराव निंबाळकर यांचे निधन झाल्यामुळे कोणताच जल्लोष न करता दिवंगत संचालक संपतराव निंबाळकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.