दौंड : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पुणे जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत पक्षाचे उपनेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ते शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. महेश पासलकर हे उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक होते त्यांचा शिंदे गटात प्रवेश हा ठाकरे गटाला हादरा मानला जात आहे.
पुणे जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकीत कुठेही काँग्रेस आणि राष्ट्रवादी ने उद्धव ठाकरे गटाला एकही जागा दिली नाही. याउलट त्यांचे फोटो वापरून महाविकास आघाडीच्या नावाने निवडणुका लढल्या
असा आरोप महेश पासलकर यांनी करत या निवडणुकांमध्ये संपूर्ण जिल्ह्यात एकही जागा आपल्याला देण्यात आलेली नसताना पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत मात्र काँग्रेस
, राष्ट्रवादीच्या प्रचाराला येत होते
असेही त्यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरे गटाचे खच्चिकरण करून काँग्रेस राष्ट्रवादीला बळ देण्याच्या या प्रकारामुळे व्यथित होऊन
आपण पक्षाचा राजीनामा दिला
असल्याचे त्यांनी सांगितले. महेश पासलकर यांनी शिवसेना वाढविण्यासाठी पुणे ग्रामिण मध्ये मोठे प्रयत्न केले होते. ते कोणत्या पक्षात जातात याची उत्सुकता संपूर्ण जिल्ह्यात आणि खासकरून दौंड तालुक्यात होती. ज्या मुद्द्यावरून त्यांनी ठाकरे गटाशी फारकत घेत शिंदे गटात प्रवेश केला आहे त्या शिवसेना शिंदे गट-भाजप युतीची सत्ता आमदार राहुल कुल यांच्या रूपाने दौंड तालुक्यात आहे. त्यामुळे आता भाजपचा कुल गट येणाऱ्या आगामी ग्रामपंचायत, झेडपी,पंचायत समिती व इतर निवडणुकांत शिंदे गटाचे महेश पासलकर यांना जागा देणार का की तेही काँग्रेस, राष्ट्रवादी सारखे त्यांना बाजूला ठेवणार असा प्रश्न सर्वसामान्य शिवसैनिकाला पडला आहे.