Daund | लूटमार करणाऱ्या गुंडांचा शहरात हैदोस, दोघांना अटक

अख्तर काझी

दौंड : दौंड शहरात लूटमार करणाऱ्या गुंडांनी हैदोस घातला आहे. या गुंडांना जरब बसविण्याचे काम आता पोलिस प्रशासनाला करावे लागणार आहे. दौंड शहरात नुकतीच एका युवकाला मारहाण करत लुटण्याचा आल्याची घटना घडली आली असून दुसऱ्या एका घटनेत दुचाकीस्वार युवकाला लुटण्याच्या प्रयत्नात त्याला जखमी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोन सराईत गुंडांना दौंड पोलिसांनी अवघ्या दोन तासातच घातक शस्त्रांसह अटक केली आहे.

दौंड -सिद्धटेक रोडवरील सिंधी मंगल कार्यालयासमोर असणाऱ्या कात्रज डेअरीमध्ये दूध घेण्यासाठी आलेल्या नागरिकाला लुटल्याची घटना घडली आहे. मल्लिकार्जुन मुनमुटगी हे रात्री 8.30 वा. सुमारास कात्रज डेअरी मधून दूध घेऊन घरी निघाले असता त्यांच्या ओळखीच्या गणेश कोळी व अमोल गायकवाड यांनी त्यांना बोलाविले व विनाकारण त्यांना मारहाण केली तसेच त्यांच्या खिशातील 5 हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. यानंतर मल्लिकार्जुन त्या दोघांना धक्का मारून निघाले असता गणेश कोळी याने आपल्याकडील कोयत्याने त्यांच्या दुचाकीचे नुकसान केले. दौंड पोलिसांनी गणेश कोळी व अमोल गायकवाड (रा. गोवा गल्ली, दौंड) यांच्या विरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

सदरचा गुन्हा घडल्याचे कळताच पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी या सराईत गुंडांना तात्काळ पकडण्याच्या सूचना केल्या. पांडुरंग थोरात, सुभाष राऊत ,अमोल देवकाते या पोलीस पथकाने शोध घेत रात्रीतच या गुंडांच्या हत्यारा सहित मुस्क्या आवळल्या .
शहरातील दुसऱ्या एका घटनेत दोन अज्ञात चोरांनी शहरातील हुतात्मा चौक परिसरात युवकास लुटण्याचा प्रयत्न केला. परंतु युवकाने धाडस दाखवीत चोरांचा प्रतिकार केल्याने चोरटे आपली दुचाकी व चाकू घटनास्थळीच सोडून पसार झाले. सौरभ संतोष भंडारी(रा. गांधी चौक ,दौंड) असे युवकाचे नाव आहे. सौरभ यांच्या फिर्यादीवरून दौंड पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी 6 मे रोजी रात्री 10.30 वा. सुमारास येथील हुतात्मा चौकातून रेल्वे स्टेशन रोड कडे पायी जात असताना पाठीमागून दोघे दुचाकी वर आले व त्यांनी फिर्यादीकडील मोबाईल हिसकवण्याचा प्रयत्न केला असता फिर्यादी यांनी विरोध केला व त्यांनी त्यांची दुचाकी पकडून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. हे करत असताना ते खाली पडले परंतु त्यांनी त्यांची दुचाकी सोडली नाही. चोरट्यांनी त्यांना फरपटत नेल्याने ते जखमी झाले.

दरम्यान झटापटीत दोघे चोरटेही दुचाकी वरून खाली पडले. त्यांना पकडण्यासाठी आरडाओरडा केल्याने दोघेही चोरटे आपली दुचाकी व त्यांच्याकडील चाकू सोडून पळून गेले. फिर्यादी यांचा आरडाओरडा ऐकून सामाजिक कार्यकर्ता धरम बनसोडे तेथे आले. दोघांनी मिळून चोरट्यांची दुचाकी व चाकू दौंड पोलिसांकडे जमा केला. दौंड शहरात व बाजारपेठेत लुटमार व गुंडगिरी करणाऱ्या कोणाचीच गय केली जाणार नाही, त्यांना कठोर शासन केले जाईल असे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील म्हणाले.