अब्बास शेख
पानिपत म्हटलं की आठवते ती घनघोर लढाई आणि त्यात मारले गेलेले लाखो सैनिक आणि विनाश पावलेली एक पिढी, त्यामुळेच विनाश किंवा सगळं संपलं, दुर्दैवी हार याला मराठी म्हणींमध्ये पानिपत म्हटलं जाऊ लागलं. जेथे सगळंच संपलं आता काही पर्याय उरलं नाही यालाही आपल्याकडे पार पानिपत झालं राव असं संबोधलं जातं… असंच एक पानिपतसहकारात झालं होतं आणि ते पानिपत होतं भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचं.
कारखाना कर्जाने बुडाला, कारखान्यात आता काहीच उरलं नाही, मशिनरी विकून सुद्धा साधे कामगारांचे पगार भागणार नाहीत आणि मशिनरी सुद्धा कशी विकणार ?? कारण त्यावरही कर्ज आहे. त्यामुळे हा कारखाना गेला अशी परिस्थिती झाली होती. यावर शिक्कामोर्तब झाले ते तीन वर्षे कारखाना बंद पडल्यामुळे. आता मात्र कारखान्याचे 100% पानिपत झाले हे खुद्द कुल गटातील काही कार्यकर्ते सुद्धा खाजगीत कबुल करायला लागले होते. जसे पानिपतामध्ये सगळं संपलं होतं असं मानलं जातं होतं आणि नेमका एक आशेचा किरण महादजी शिंदे यांच्या रूपाने जिवंत होता तशीच काहीशी आशा या कारखान्याचे चेअरमन राहुल कुल यांच्या मनात घर करून होती.
कारखाना वाचवायचा म्हणजे सोप्पे नाही, कर्जाचा मोठा डोंगर आणि अंगा पेक्षा भोंगा मोठा अशी काहीशी परिस्थिती या कारखान्याची झालेली. त्यामुळे यातून रस्ता निघणं तसं खूप अवघड होतं मात्र शरद पवारांच्या आखाड्यात काही वर्षे राजकीय पाहिलवानकी शिकलेल्या आणि नंतर फारकत घेतलेल्या आ. राहुल कुल यांनी आपले संपूर्ण कौशल्य पणाला लावत, आपले राजकीय डावपेच वापरत अगोदर मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक वाढवत त्यांचा विश्वास संपादन केला. नंतर त्यांच्याकडून कारखान्याला मदत घेऊन कारखाना ‛डुबनेवाले को तिनके का सहारा’ या म्हणी प्रमाणे वाचविण्याचा प्रयत्न केला.
कारखाना गेला म्हणून विरोधक ज्यावेळी स्वस्त बसले होते त्यावेळी कुल यांनी मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या सहाय्याने थेट दिल्ली गाठली तेथे सहकार मंत्री तथा देशाचे गृहमंत्रीअमित शहा तसेच विविध महत्वाच्या मंडळींशी भेटीगाठी केल्या आणि असे काही पैत्रे आजमावले ज्यामुळे ‛साप भी मरे, और लाठी भी ना टुटे’ असा काहीसा उपाय शोधून काढला. नी थेट भीमा पाटस कारखान्याचा सायरन वाजू लागला. या सायरनने तालुक्यात ‛कही खुशी, कही गम’ अशी परिस्थिती बनली. कारखाना भाडे करारावर चालवायला दिला म्हणून विरोधकांमध्ये ‛गम’ तर कसा का होईना पण कारखाना तर चालू झाला ना म्हणून कुल गटात ‛खुशी’ पहायला मिळत होती. हे सर्व होत असताना कारखान्यात भ्रष्टाचार झाला म्हणून भाजप चे माजी जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणे यांनी आरोप केले आणि हे आरोप थेट राज्याच्या राजकारणात पोहचून तालुक्याचे नाव राज्यपातळीवर झळकू लागले. यात माजी आमदार रमेश थोरात यांनीही उडी घेत आ.राहुल कुल यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. यात खासदार संजय राऊत यांनी तालुक्यात सभा घेत कुल यांच्यावर 500 कोटींच्या मनी लॉंड्रिंग चा आरोप केला आहे. तसेच कुल यांनी कारखान्यावर को-जनरेशन, डिस्टलरी प्रकल्प सुरू केल्याने कर्जाचा बोजा अफाट वाढला आणि त्यातून कारखाना लिलावात निघायची पाळी आली असा आरोपही विरोधकांमधून होत आहे.
आता यात नेमकं काय खरं, काय खोटं हे आरोप करणाऱ्यांना आणि त्याचे उत्तर देणाऱ्या कुलांनाच माहीत पण यात जो कारखाना पानिपताच्या दिशेने वाटचाल करत होता. ज्या कारखान्याचा कधीही लिलाव होऊन तो संपणार होता. त्या कारखान्याला सध्यातरी वाचवण्याचे काम कुल यांनी आपल्या कौशल्याने केले आहे हे मात्र नाकारता येणार नाही. तालुक्याच्या बांधावर असणारा यशवंत सहकारी एकदा बंद पडला तो पुन्हा सुरू करण्यात अजूनही यश आले नाही मात्र भीमा पाटस कारखाना डबघाईला आला. त्यावर कर्जाचे ओझे झाले तरीही तो कसा का होईना सुरू झाला आणि त्याचे पेमेंट शेतकऱ्याला मिळायला लागले हे मात्र शेतकरी, सभासदांसाठी आनंदाची बाब समजली जात आहे. कारखान्यावर होणारे आरोप, त्याला दिली जाणारी उत्तरे कायमच सुरू राहणार आहेत मात्र सध्यातरी कारखाना सुरू झाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर ‛आनंद’ आहे हे मात्र नक्की.
टीप – हा लेख किंवा यातील मजकूर हा कॉपीराईट क्लेम अंतर्गत सुरक्षित करण्यात आला आहे. त्यामुळे कुणीही यातील वाक्यरचना, या लेखातील मजकूर कॉपीपेस्ट करून आपल्या वृत्तपत्रात अथवा वेबसाईट, वेबपोर्टलवर वापरू नये अन्यथा कॉपीराईट क्लेम तसेच लेख चोरीच्या कायद्यांतर्गत कठोर कारवाई केली जाईल