दौंड : दौंड तालुक्यातील पारगाव येथे चोरीच्या उद्देशाने तीन अज्ञात व्यक्तींनी इंडिया वन कंपनीचे एटीएम उडवून आतील कॅश चोरी करण्याचा प्रयत्न केला मात्र ऐनवेळी लोकांची चाहूल लागल्याने चोरट्यांनी पोबारा केला आहे. याबाबत यवत पोलीस ठाण्यात किशोर निंबाळकर यांनी फिर्याद दिली असून एटीएम (ATM) मध्ये स्फोट घडवून आणण्याचा आणि कॅश चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दि. 4 मे रोजी रात्री 1:30 ते 2:00 वाजण्याच्या सुमारास पारगाव (ता.दौंड) येथे तीन अज्ञात चोरट्यांनी चोरी करण्याच्या उद्देशाने इंडिया वन कंपनीचे एटीएम स्फोटकांच्या सहाय्याने उडवून देण्याचा तसेच आतील कॅश चोरी करण्याचा प्रयत्न केला. एटीएम मधील पैसे चोरत असताना त्यांना लोकांच्या चाहूल लागल्याने ते अंधाराचा फायदा घेत उसाच्या शेतातून फरार झाले. याबाबत यवत पोलीस अधिक तपास करत असून आरोपींनी स्फोटकांच्या सहाय्याने एटीम उडवून देण्यासाठी जिलेटीनच्या कांड्यांचा वापर करत असल्याचे समोर आले आहे.
इतकी भयानक स्फोटके त्यांच्याजवळ आली कोठून आणि त्यांनी याचा वापर कुठे कुठे केला असावा याची चर्चा संपूर्ण पारगाव परिसरात सुरू आहे. तर चोर, आणि दरोडेखोरांवर यवत पोलिसांचा वचक राहिला नसल्याने त्यांची इतकी मोठी हिम्मत होत असून पोलिसांच्या राउंडला येणाऱ्या गाड्या फक्त सायरन वाजवत भरधाव वेगाने निघून जातात आणि चोर बिनधास्तपणे आपले काम सुरू ठेवतात अशीही चर्चा सध्या या परिसरात सुरू आहे.
टीप – कॉपीपेस्ट बहाद्दर, बातमी चोरांनी आमच्या बातम्या, माहिती कॉपीपेस्ट अथवा यातील विशेष मजकूर चोरून आपल्या बातमीत वापरू नये अन्यथा कॉपीराइट, चोरी कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येईल