अबब | दौंड मध्ये महाराष्ट्रदिनी सरकारी दवाखान्यात झेंडावंदनच नाही ! प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस

अख्तर काझी

दौंड : शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यालयामध्ये महाराष्ट्र दिनी (1 मे) भारतीय तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहनच केले नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याची गंभीर दखल घेत पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी यांनी येथील प्राथमिक आरोग्य पथकातील वैद्यकीय अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

शासकीय नियमानुसार 1 मे, महाराष्ट्र दिन साजरा करणे आवश्यक असताना आपण मुख्यालयात उपस्थित दिसून आला नाही व महाराष्ट्र दिनी आपल्या कार्यालयाच्या ध्वजस्तंभावर भारताच्या तिरंगा ध्वजाचे यथोचित ध्वजवंदन झाले नाही. त्याबाबत वरिष्ठांकडे तक्रार झाली असून सदरील बाबतीत आपण हलगर्जीपणा केलेले दिसून येते. तरी आपण महाराष्ट्र दिनी आपल्या कार्यालयाच्या ध्वजस्तंभावर ध्वजारोहन का केले नाही याचा सविस्तर खुलासा तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयामार्फत जिल्हा आरोग्य अधिकारी (जि.प.पुणे) यांना तत्काळ सादर करावा. खुलासा विहित मुदतीत सादर न झाल्यास आपणावर नियमानुसार प्रशासकीय कार्यवाहीसाठी प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर करण्यात येईल असे नोटिशीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

शासकीय कार्यालयातच जर अश्या चुका होत असतील तर मग सर्वसामान्यांनी कुणाकडून बोध घ्यायचा असा सवाल उपस्थित केला जात आहे.