अख्तर काझी
दौंड : दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही सर्वसामान्य जनतेने हातात घेतलेली होती आणि अशा जनादेश देणाऱ्या लोकांमध्ये मी रोज बसतो आहे त्यामुळे कोण चांगले करतो हे येथील जनतेला चांगलेच माहित आहे. आणि याच शेतकरी बांधवांच्या हितासाठी बाजार समितीची निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आणि बाजार समितीच्या 18 जागांपैकी निम्म्या जागा आम्ही जिंकल्या आहेत. विजय मतदारांचा आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आहे.
आमचा स्वतःवर व येथील जनतेवर विश्वास आहे त्यामुळेच आम्हाला दुसऱ्या पक्षातील कोणा नेत्याला येथे आणावयाची गरज पडत नाही. विरोधकांना मात्र आमच्याशी लढायला बाहेरून लोक आणावे लागत आहेत असा टोला भाजपाचे आमदार राहुल कुल यांनी माजी आमदार रमेश थोरात यांचे नाव न घेता लगावला. बाजार समिती निवडणूक निकालानंतर कुल यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
कृषी उत्पन्न बाजार समिती याआधी फक्त राजकारणासाठी वापरली जायची, काही मोजक्या लोकांचेच तेथे प्राबल्य असायचे परंतु यंदा मतदारांनी बदलाच्या दृष्टीने कौल दिलेला आहे. क्रॉस वोटिंग व बाद मतांमुळे मोठ्या विजयाचे गणित थोडक्यात हुकले असले तरी विरोधकांना विचार करायला लावणारा हा निकाल आहे. आणि म्हणूनच निम्म्या जागेवर विजय मिळविला असताना सुद्धा आम्ही विजयाचा जल्लोष करीत आहोत त्यांना मात्र तोंड लपवून घरात बसण्याची वेळ आली. आम्ही बाजार समिती गतिमान करू ,येथील असुविधा दूर करून ग्राहक, व्यापारी आणि शेतकरी यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू असेही कुल म्हणाले.
जनतेने दिलेला जनादेश हाच अंतिम असतो. त्यातच समाधान मानायचे असते आणि त्याच्यामधून शिकून पुढे जायचे असते. मागील निवडणुकी मधील आमचा पराभव हा तांत्रिक पराभव होता, व्यूह रचना चुकली होती ती यावेळी दुरुस्त केल्यामुळे विजय मिळाला.
भीमा पाटस कारखान्यातील भ्रष्टाचाराच्या आरोपावर बोलताना राहुल कुल म्हणाले की, कारखान्याची जेव्हा वाताहात झाली असताना आम्ही पाठ दाखवून पळून गेलो नाही. सभासदांची आणि कामगारांची जबाबदारी घेतली. मिळेल ती मदत मिळवीत कारखाना आता चांगल्या रीतीने सुरू केला आहे. भीमा पाटस सुरक्षित हातात आहे. कामगारांचे सर्व हक्क अबाधित आहेत, त्यामुळे कामगार व सभासद समाधानी आहेत.
खासदार संजय राऊत यांनी त्यांच्याकडे आलेल्या लोकांचा इतिहास तपासून पहावा व मगच त्यांनी पुढची दिशा ठरवावी असा सल्लाही कुल यांनी राऊत यांना दिला आहे. आमच्यावर दरोड्याचा आरोप करणाऱ्यांनी दरोड्याचा इतिहास नेमका कोणाचा आहे हे दौंडच्या जनतेला सांगावे. या पत्रकार परिषदेवेळी मा. जेष्ठ नगरसेवक प्रेमसुख कटारिया, कांचन कुल, वासुदेव नाना काळे, नंदू पवार, महेश भागवत, आनंद थोरात ,नामदेव बारवकर आदी उपस्थित होते.