राष्ट्रवादीचे माजी प्रदेश सरचिटणीस नानासाहेब फडके यांचे आकस्मिक निधन

दौंड : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश सरचिटणीस तथा मा. आमदार रमेश थोरात यांचे विश्वासू सहकारी नानासाहेब फडके यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले आहे. नानासाहेब फडके हे भाऊ म्हणून संपूर्ण तालुक्यात परिचित होते. हातवळनचे माजी सरपंच सागर फडके तसेच विद्यमान सरपंच योगेश फडके यांचे ते वडील होते.

गुरुवारी रात्री उशीरा त्यांना अचानक अस्वथ वाटू लागले होते. लागलीच त्यांना केडगाव येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी हलविण्यात आले मात्र तेथे त्यांची तब्येत नाजूक बनल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते त्यामुळे त्यांना तेथून तात्काळ लोणीकाळभोर येथील हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आले मात्र त्यांना तेथे मृत घोषित करण्यात आले.

नानासाहेब फडके यांनी भीमा पाटस सहकारी साखर कारखाना तसेच कात्रज दूध संघावर पाच वर्षे संचालक म्हणून काम पाहिले होते. नानासाहेब हे माजी आमदार रमेश थोरात यांचे खंदे समर्थक होते. त्यांच्या अचानक जाण्याने थोरात गटावर मोठा आघात झाला आहे. नानासाहेब फडके यांना दोन विवाहित मुले व तीन विवाहित मुली आणि दोन नातवंडे असा परिवार आहे. नानासाहेबांच्या अचानक जाण्याने हातवळण गावावर शोककळा पसरली आहे.