दौंड : खासदार संजय राऊत यांनी भीमा पाटस साखर कारखाना व आमदार राहुल कुल यांच्यावर पाचशे कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. याचे तीव्र पडसाद सध्या दौंड तालुक्यात उमटत आहेत. आणि ज्यामुळे तालुक्याचे राजकारण चांगलीच तापले आहे.
त्याच अनुषंगाने आमदार राहुल कुल समर्थकांनी माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांच्या नेतृत्वाखाली दौंडमध्ये संजय राऊत यांच्या निषेधार्थ मोर्चा काढून आंदोलन केले. राहुल कुल या वाघाची शिकार करायला जाल तर स्वतःचीच शिकार होऊन बसेल हे चांगले ध्यानात घ्या असे आव्हानच कुल समर्थक प्रेमसुख कटारिया आणि कूल समर्थकांनी विरोधकांना दिले आहे.
निषेध मोर्चाची सुरुवात येथील छत्रपती शाहू महाराज स्मारकापासून करण्यात आली. मोर्चामध्ये प्रचंड संख्येने कुल समर्थक सहभागी होते. खासदार संजय राऊत मुर्दाबाद च्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. मोर्चाची सांगता येथील पंचायत समिती कार्यालयासमोर करण्यात आली. यावेळी झालेल्या सभेमध्ये नंदू पवार ,तानाजी दिवेकर ,महेश भागवत, माऊली ताकवणे, हरिभाऊ ठोंबरे, अमोल सोनवणे व बापू भागवत यांनी खा.संजय राऊत यांचा खरपूस समाचार घेतला.
प्रेमसुख कटारिया म्हणाले की, महाराष्ट्रातील कितीतरी कारखाने बंद पडलेले आहेत. फक्त भीमा पाटसच नाहीतर अनेक नेत्यांचे कारखाने बंद पडले. वय लहान असताना राहुल कुल यांनी 112 कोटी रुपयांचे कर्ज असलेला कारखाना आपल्या हाती घेतला आणि तो हिमतीने सुरू केला. आत्ताच्या महाविकास आघाडीतील नेते दादांचे कौतुक करत होते. भीमा पाटस वरील 112 कोटी रु. कर्जाविषयी बोलताना नामदार शरद पवार म्हणाले आहेत की हे सुभाष अण्णांचे नाहीत, याला सुभाष कुल जबाबदार नाहीत, तत्कालीन ज्यांना कारखाना चालविण्याचे अधिकार दिलेले होते ते जबाबदार आहेत. आणि ते कोण आहेत हे सभासदांना चांगली माहित आहे, तेव्हा कारखाना कोण चालवीत होते. कारखान्याच्या जनरल मिटींगला उपस्थित राहायचे नाही आणि कारखान्याच्या विरोधात मोर्चा मात्र काढायचा.
तुम्ही कारखाना निवडणूक लढवायची व काय तो पर्दाफाश करायचा ना… पण तेही करायचे नाही. आणि आता तर षंढा सारखे झाले आहे, दोन पाच कार्यकर्ते गोळा झाले आणि कुठली 500 कोटींची कागदपत्रे राऊत यांना दिली म्हणतात. आता या संजय राऊत यांचा तर अक्षरशः वीट आलाय. 24 तास टीव्हीवर कोणावर ना कोणावर फक्त आरोप करतो आहे. स्वतः भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये जेलमध्ये जाऊन यायचे व दुसऱ्यावर आरोप करायचे काय प्रकार चालला आहे हा. सध्या महाराष्ट्रातील 32 कारखाने बंद आहेत असे असताना राहुल कुल यांनी आपल्या प्रयत्नाने भीमा पाटस कारखाना चालू केला आहे. म्हणूनच या राहुल कुल ला सहन करण्याची कुवत या विरोधकांमध्ये राहिलेली नाही. त्यांना माहिती आहे की हे भूत आता या निवडणुकीपुरते नाही तर त्यांचा संपूर्ण ऱ्हास होऊन जाईल व हा मानगुटीवर बसलेला दिसणार आहे.
भीमा पाटस कारखान्याला 36 कोटी रुपये मंजूर झाल्यानंतर लगेच आम्ही आमचे पैसे वसूल करणार अशी विरोधकांची भाषा होती. कारखाना चालू करण्याआधी आमचे पैसे भरा अशी मागणी त्यांनी केली. ते असे नाही म्हणाले की, कारखाना बंद पडला आहे यापेक्षा अधिक कर्ज घ्या पण कारखाना चालू करा, हा शेतकऱ्यांचा कारखाना आहे असे म्हणणारे कोणी दिसले नाही असेही कटारिया म्हणाले. राहुल कुल कळालेत फक्त अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांना. राहुल कुल त्यांच्या हृदयामध्ये जाऊन बसला आणि म्हणून कारखाना पूर्ववत चालू झाला आहे. नुसता चालू झाला नाही तर शेतकरी बांधवांना पंधरा दिवसांमध्ये पैसे मिळत आहेत, ही किमया राहुल कुलमध्ये आहे. आणि म्हणून राहुल कुल यांच्या विरोधात हे सर्व चालले आहे हे सर्वांनी चांगले लक्षात घ्यावे अश्या शब्दांत माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.