मुंबई : अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळीमुळे हिरावून घेतला गेला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. याबाबत विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी आक्रमक होत सभात्याग केला आहे.
आज विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत प्रखर टिका केली आहे. अजित पवार यांनी बोलताना ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर हे राज्य चालतं, त्या शेतकऱ्यांना मदत मिळत नाही, त्यांच्या आत्महत्या होतं आहेत हे दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे तसेच कृषी मंत्र्यांच्या स्वतःच्या मतदार संघात सुद्धा शेतकरी आत्महत्या होतायत हे दुःखद आहे. शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी दिलासा द्यायला हवा होता. शेतकऱ्यांबाबत ठाम निर्णय होणं गरजेचं आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना अजून मदत मिळालेली नाही असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
विरोधक आक्रमक
शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून नाना पटोले, छगन भुजबळ यांनी शेतकऱ्यांसाठी विधानसभेत आवाज उठवून शेतकऱ्यांना त्वरित मदत करण्याची मागणी केली आहे. अधिवेशन काळात शेतकऱ्यांच्या होतं असलेल्या आत्महत्या ही गंभीर बाब आहे असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विधासभेत मोठा गदारोळ झाल्याचे पहायला मिळत आहे.
मुख्यमंत्री शिंदे-भुजबळ यांच्यात खडाजंगी
शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बोलत असताना शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार असे छगन भुजबळ यांनी आक्रमक होत विचारताच मुख्यमंत्री शिंदे यांनीही आक्रमक होत आम्ही पंचनामा करून त्वरित 12 हजार कोटींची मदत दिली असल्याचे म्हटले, तसेच तुमच्या सारखे फक्त कागदी 50 हजार रुपये प्रत्येकी जाहीर करून ते लोकांना दिले का असा प्रति प्रश्न उपस्थित केला.