मुंबई : निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि चिन्ह हे शिंदे गटाला दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोग, शिंदे गट आणि भाजपावर हल्ला चढवला आहे.
उद्धव ठाकरे यांनी बोलताना, सध्या देशात सरकारची दादागिरी सुरु आहे. न्याययंत्रणा आपल्या आधीपत्याखाली कशी येईल याचा प्रयत्न सुरु आहे. सध्याची परिस्थिती पाहता देशातील लोकशाही संपली आहे असे वातावरण आहे. आजचा निर्णय अनपेक्षित आहे. जो पर्यंत न्यायालयाचा निकाल लागत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाने निर्णय देऊ नये हे मी मागेच बोललो होतो पण यांनी दबाव आणून हे सर्व केले आहे. उद्या आमचे मशाल चिन्ह सुद्धा ते घेतील यात शंका नाही असा हल्ला त्यांनी विरोधकांवर चढवला आहे.
या निर्णयाविरुद्ध आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत. अगोदरच हे म्हणत होते विजय आमचा होणार याचा अर्थ हा कट करून सर्व केले गेले आहे हे यांच्या वक्तव्यावरून लक्षात येत आहे. धनुष्यबाण हा बाळासाहेब ठाकरे यांचा होता. ते चोरांच्या हातात जाऊ देणार नाही. शिवसैनिकांनो खचू नका, हिम्मत सोडू नका, विजय आपलाच होईल असे आवाहन त्यांनी शिवसैनिकांनी केले आहे.
शेवटी बोलताना त्यांनी या नमर्दाना हि चोरी पचणार नाही ते बाळासाहेबांची चोरी करु पाहत आहे, चिन्हाची चोरी करु पाहत आहे पण हे त्यांना साध्य होणार नाही. जनता यांना धडा शिकवेल असे शेवटी उद्धव ठाकरे यांनी सांगितले.