दौंड | चोरट्याने केली थेट बँकेतूनच पैशाची बॅग लंपास, खातेदाराला 1 लाख 60 हजारांचा ‘फटका’

अख्तर काझी

दौंड : शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेतून खातेदाराची 1 लाख 60 हजार रू. रोकड असलेली बॅग अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली. या प्रकरणी काळुराम अर्जुन गोरे (रा. वायरलेस फाटा,गिरिम,दौंड) यांनी दौंड पोलिसात फिर्याद दिली आहे.

दौंड पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. व्यापार पेठेतील वर्दळीचे ठिकाण असणाऱ्या राष्ट्रीयकृत बँकेतूनच चोरट्याने पैशाची बॅग चोरून नेल्याने खातेदारांच्या पैशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, दि.28 डिसेंबर रोजी दु. 12.15 वा. सुमारास येथील भंगाळे हॉस्पिटल परिसरात असणाऱ्या स्टेट बँकेच्या शाखेत सदरची घटना घडली. फिर्यादी यांनी येथील कॅनरा बँकेतून 90 हजार रु व स्टेट बँकेतून 70 हजार रुपये काढले. हे 1 लाख 60 हजार रुपये त्यांनी एका बॅगेत ठेवले.व स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेतील काउंटरच्या समोर असलेल्या खुर्चीवर बसून बँक अधिकारी यांच्याशी बँक पुस्तक व एटीएम बाबत ते चौकशी करत होते. त्यावेळी फिर्यादी यांनी आपल्याकडील पैशाची बॅग खुर्ची शेजारीच ठेवलेली होती. दरम्यान कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांची नजर चुकवून पैशाची बॅग लंपास केली.

शहरातील असणाऱ्या बँक परिसरात पाळत ठेवून, बँकेतून पैसे काढून घरी निघालेल्या व्यक्तींच्या पैशाच्या बॅगा चोरट्यांनी लंपास केल्याच्या घटना शहरात याआधीही घडलेल्या आहेत. त्यामुळे अशा प्रकारे बँक परिसरात थांबून, पाळत ठेवून लोकांचे पैसे लुबाडणारी टोळी शहरात पुन्हा ऍक्टिव्ह झाली आहे का? अशी चर्चा होऊ लागली आहे.