|सहकारनामा|
दौंड : कोरोना काळात सर्वत्र लॉक डाऊन असतानाही गावठी दारू बनविणाऱ्यांना दौंड पोलिसांनी दणका दिला आहे. तालुक्यातील मलठण येथील गावठी दारू च्या अड्ड्यावर दौंड पोलिसांनी धाड टाकीत दारू भट्टी उध्वस्त करीत 86 हजाराचा मुद्देमाल जप्त करून तिघां विरोधात गुन्हा दाखल केला आहे. निलेश जगन्नाथ लोंढे (रा. ज्योतिबा नगर,दौंड) रमेश भिवाजी शेंडगे, गणेश मारुती शेंडगे (दोघे रा. मलठण)अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
मलठण गावच्या हद्दीतील चव्हाण वस्ती परिसरात गावठी दारूची भट्टी लावली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी त्या दारू भट्टी अड्ड्यावर धाड टाकली, पोलिसांची चाहूल लागताच आरोपी फरार झाले. पोलिसांनी या ठिकाणाहून गावठी दारू (हातभट्टी) बनविण्यासाठी लागणारे मोठ्या प्रमाणावरील कच्चे रसायन, पत्र्याची टाकी, दोन इलेक्ट्रिक मोटार असा 86 हजाराचा मुद्देमाल जप्त केला.
आरोपी या ठिकाणी भट्टी लावून गावठी दारू तयार करीत होते पोलिसांची धाड पडताच त्यांनी तेथून पळ काढला, फरार आरोपी विरोधात पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास सहा. पो. निरीक्षक शिंदे करीत आहेत.