अख्तर काझी
दौंड शहर : भारतीय जनता पार्टी पक्षाचे नेते व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रपुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याने त्यांच्या विरोधात अनुसूचित जाती प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी अशी मागणी करीत येथील समस्त बहुजन वर्गाच्या वतीने पाटील यांचा निषेध करण्यात आला. यावेळी निषेधाचे निवेदन दौंड पोलिसांना देण्यात आले.
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भिक मागून शाळा सुरू केल्या असे बेताल वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केल्याने समस्त बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या आहेत असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी कायद्यान्वये कारवाई करण्यात यावी. अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
या राष्ट्रपुरुषांनी शाळांसाठी भीक मागितली होती याचे पुरावे चंद्रकांत पाटील यांनी द्यावे नाहीतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. गुन्हा दाखल न झाल्यास दौंड मध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन देते वेळी, नागसेन धेंडे, भारत सरोदे, नरेश डाळिंबे, जयदीप बगाडे, विनोद भालसेन तसेच दलित संघटनेतील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.