मुंबई : राज्यातील वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्याने महाराष्ट्र सरकारविरोधात राज्यातील विविध पक्षाचे नेते आक्रमक होताना दिसत आहेत. विरोधीपक्षनेते अजित पवार, मनसे नेते राज ठाकरे, खा.सुप्रिया सुळे यांनी वेदांता प्रकल्पवरून आक्रमक होत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल विचारला आहे. सुप्रिया सुळे यांनी तर सरकारला विनंती करत, आपण अजितदादा पवार यांनी वेदांता ग्रुपच्या प्रकल्पाबाबत लिहिलेले पत्र विचारात घेऊन, महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी अशी विनंती केली आहे.
तर राज ठाकरे यांनी, फॉक्सकॉन-वेदांताचा सेमीकंडक्टर बनवण्याचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. ह्या प्रकल्पाची एकूण गुंतवणूक १ लाख ५८ हजार कोटींची आहे. हा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव येथे होणार होता. प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता असणारा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा? असा सवाल उपस्थित करत हा प्रकार गंभीर असल्याचे म्हटले आहे.
तसेच ह्या विषयाची सखोल चौकशी व्हायलाच हवी. महाराष्ट्र हे गुंतवणूकदारांच्या प्राधान्यक्रमाचं राज्य होतं. अशा राज्यातून गुंतवणुकीचा उलटा प्रवास सुरु होणं हे चांगलं लक्षण नाही. राजकारणाच्या पलीकडे जाऊन ह्या विषयाकडे बघायला हवं असं मत त्यांनी मांडलं आहे.