दौंड’मधील गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार, मुस्लिम, ख्रिश्चन बांधवांकडून गणेश मंडळांचे स्वागत

दौंड : कोरोना महामारीमुळे मागील दोन वर्ष कोणताही सण- उत्सव साजरा केला गेला नाही यंदा मात्र महामारी आटोक्यात आल्याने व प्रशासनाने बऱ्यापैकी निर्बंध शिथिल केल्याने सर्वत्र उत्सव साजरे होत आहेत.

दौंडमध्येही सर्वच समाजाने एकत्र येत साजरा केलेला गणेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. दहा दिवसांच्या मुक्कामानंतर आपल्या लाडक्या बाप्पाला गणेश भक्तांनी मोठ्या भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. सर्वच मंडळांच्या कार्यकर्त्यांनी राखलेला संयम व त्यांनी पोलीस प्रशासनाला दिलेली साथ यामुळे शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक वेळेत व कोठेही अनुचित प्रकार न घडता अगदी शांततेत व उत्साह पूर्ण वातावरणात पार पडली.

परंपरेप्रमाणे येथील शिवाजी चौकात मुस्लिम व ख्रिश्चन बांधवांनी गणेश मंडळांचे हार, नारळ देऊन स्वागत केले. मा. नगराध्यक्ष बादशाह शेख, सोहेल खान, फिलिप अँथोनी,मा. नगरसेवक राजेश गायकवाड, वसीम शेख, शहानवाज पठाण यांच्या हस्ते मंडळाचे स्वागत करण्यात आले. बहुसंख्येने मुस्लिम बांधव यावेळी उपस्थित होते. शहरातील जातीय सलोखा राखण्यासाठीच्या या उपक्रमाला सर्वांनीच उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

सकाळपासूनच घरगुती गणपती व शहरातील छोट्या मंडळांनी आपल्या बाप्पाच्या विसर्जनासाठी नदीकाठावर गर्दी केलेली होती. सायंकाळी 7 नंतर शहरातील मोठ्या मंडळांचे गणपती विसर्जन मार्गावर येण्यास सुरुवात झाली. निर्बंधांची भीती नसल्याने गुलाल भंडाऱ्याची मुक्त उधळण करीत, आपल्या आवडत्या गाण्यांच्या तालावर मनसोक्त नाच करीत कार्यकर्त्यांनी विसर्जन मिरवणुकीचा भरपूर आनंद घेतला. शिवसेनेचे शहराध्यक्ष आनंद पळसे यांच्या वतीने गणेश भक्तांसाठी नदीकाठावर जेवणाची सोय करण्यात आली होती तर विसर्जन मार्गावरील गांधी चौकामध्ये दौंड शिवसेना व माजी नगरसेविका अनिता दळवी गणेश दळवी यांच्या पुढाकाराने महाअन्नदानाचा उपक्रम राबविण्यात आला.

मा. नगराध्यक्ष शितल कटारिया, इंद्रजीत जगदाळे तसेच नंदू पवार,गोविंद अग्रवाल, शिवसेनेचे पदाधिकारी अनिल सोनवणे, राजेंद्र खटी यांच्या हस्ते अन्नदान करण्यात आले.
दोन वर्ष कार्यकर्त्यांना कोणत्याच उत्सवाचा आनंद घेता आलेला नाही या कार्यकर्त्यांच्या भावना समजून दौंड पोलिसांनी ही सहकार्याची भूमिका घेतल्याने मिरवणुकी दरम्यान कुठेही वाद झाले नाहीत.दौंड चे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस व पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाने दौंड पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली.