शिवसेना-संभाजी ब्रिगेड एकत्र आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह, जनतेचे प्रश्न समन्वयाने सोडवणार : महेश पासलकर

दौंड : भाजपाकडून केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात प्रादेशिक अस्मिता चिरडून टाकत प्रादेशिक आणि इतर विरोधी पक्षांना संपवण्याची भाषा सुरू असल्याचा आरोप करीत महाराष्ट्राची अस्मिता टिकवण्यासाठी आणि शिवप्रेमातून शिवसेना-संभाजी ब्रिगेडची युती झाल्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली असून संभाजी ब्रिगेडसोबतच्या युतीसंदर्भात आपली भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे.

याच पार्श्वभूमीवर दि.२७ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील व दौंड तालुक्यातील संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी यांनी शिवसेना कार्यकारणीबरोबर समन्वय साधून आगामी निवडणुकीत निर्णायक भूमिका घेण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांच्या उपस्थितीत शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, चौफुला येथे संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी सुनिल पासलकर (पुणे जिल्हा उपाध्यक्ष संभाजी ब्रिगेड) निलेश जांबले (जिल्हाउपाध्यक्ष, शेतकरी आघाडी, संभाजी ब्रिगेड) कुलदीप गाढवे देशमुख, (तालुकाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड) विजय भोसले, (तालुकाध्यक्ष, विद्यार्थी आघाडी संभाजी ब्रिगेड) स्वरूप ताकवणे (तालुका उपाध्यक्ष) भरत भुजबळ (जिल्हा संघटक) रसूल मुलाणी (प्रवक्ते संभाजी ब्रिगेड) सुनिल टेंगले, सोमनाथ मोरे, सिद्धार्थ देवकर, रणजीत देवकर संजय वाघ आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हा प्रमुख महेश पासलकर म्हणाले की, संभाजी ब्रिगेड व शिवसेना युती ही आगामी काळात राज्यातील राजकारणाला कलाटणी देणारी असून, आमचे हिंदुत्व पटल्याने संभाजी ब्रिगेड शिवसेनेबरोबर आली आहे. राज्य घटनेच्या संरक्षणासाठी ही युती निर्णायक लढा देईल असा विश्वास यावेळी पासलकर यांनी व्यक्त केला. पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुनिल पासलकर म्हणाले की, दौंड तालुक्यातील आगामी निवडणुकात शिवसेना व संभाजी ब्रिगेड समन्वयाने काम करणार असून, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील विविध विषयावर आक्रमकपणे आंदोलनाच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रश्न सोडवणार आहे.

यावेळी पत्रकार परिषदेच्या समारोपानंतर शिवसेना कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेड व शिवसैनिकांनी फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष केला.