नाशिक : वाहन हे मनुष्याच्या दैनंदिन जीवनातील एक अनन्य साधारन अशी गरज आहे. घरातून बाहेर पडल्यानंतर संपूर्ण गाव, शहर आणि परीसरात फिरायचे म्हटले कि वाहन हे हवेच. त्यामुळेच लोक काटकसर करून, पै पै जमा करून आपल्या गरजेनुसार आणि पसंतीनुसार छोटी मोठी वाहने घेत असतात आणि त्या वाहनाचे आयुष्य वाढावे यासाठी त्यामध्ये ब्रँडेड कंपनीचे उच्च किमतीचे ऑईल टाकत असतात. मात्र तुम्हाला हे माहित झाले कि जे ब्रँडेड ऑईल म्हणून तुम्ही वापरत आहात ते त्या कंपनीचे ब्रँडेड ऑईल नसून बनावट, डुप्लिकेट ऑईल आहे तर तुमची अवस्था काय होईल याची कल्पनाच न केलेली बरी.
नाशिक जिल्ह्यातील लासलगाव आणि विचुंरमध्ये अशीच एक डुप्लिकेट ऑईल विकणारी टोळी पोलिसांनी जेरबंद केली असून एका नामांकित कंपनीचे ऑईल भासवून ते ओरिजनल किमतीला सर्रास विकले जात असल्याचे या प्रकरणातून समोर आले आहे. लासलगाव चे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या पथकाने लासलगाव व विंचुर येथे नामांकित कंपनीचे डुप्लीकेट ॲाईल विक्री करणाऱ्या दुकानदारांवर धडक कारवाई करत 19 हजार 691 रुपयांचे डुप्लिकेट ऑईल व मुद्देमाल जप्त करून यातील आरोपिंवर गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात फरमान कबीर हसन (रा. गुरगाव, राज्य हरियाणा) यांनी फिर्याद दिली होती. त्यांच्या फिर्यादीवरून इम्तियाज इसाक काझी (रा. पिंपळगाव नजीक, जि.नाशिक) मनीष अशोकराव खुटे (रा. पिंपळगाव नजीक, जि.नाशिक) निलेश भीम शर्मा (रा. लासलगाव) संतोष जगन्नाथ राऊत (रा. विंचूर तालुका निफाड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्वजण नामांकित अश्या कॅस्ट्रॉल कंपनीचे बनावट ऑइल विकत असल्याची फिर्याद फरमान हसन यांनी दिली होती.