दौंडमधील वाहन चोरी बनली पोलिसांची डोकेदुखी

अख्तर काझी

दौंड : दौंड शहरातून दुचाकी चोरीला जात असल्याच्या घटना घडत असताना आता तर चोरट्यांनी चक्क एक चार चाकी वाहनच चोरून नेले असल्याची घटना समोर आली आहे. शहरात सातत्याने होत असणारी वाहन चोरी दौंड पोलिसांची डोकेदुखी ठरत आहे.

शहरातील शालिमार चौक येथे किराणामाल विक्रीचे व्यवसाय करणाऱ्या संतोष नंदकुमार शिंदे यांच्या मालकीचे 8 लाख रु. किमतीचे चार चाकी वाहन( रेनॉल्ट, ट्रायबर कार MH 42,BE 4568)दि.11 ऑगस्ट रोजी रात्रीच्या वेळेस चोरट्यांनी लंपास केले आहे. संतोष शिंदे यांनी दि. 10 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वा.दरम्यान आपली कार येथील चंदूकाका सराफ दुकानासमोरील किराणा मालाच्या दुकाना शेजारी लावलेली होती, चोरट्यांनी रात्रीच्या वेळेस ती चोरून नेली आहे.

शहरातून दुचाकी वाहन चोरीला जाण्याचे प्रमाणही वाढलेले आहे तसेच गोल राऊंड चौक परिसरामध्ये चोरांकडून महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून नेल्याच्या घटनाही घडत आहेत. चैन स्नॅचिंग करणारी टोळीच या परिसरात कार्यरत असल्याची भीती नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मागील दोन दिवसांपूर्वीच सायंकाळी 7-8वा. दरम्यान गोल राऊंड परिसरातील रस्त्याने पायी जात असलेल्या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन चोराने चोरून नेली असल्याची घटना घडली आहे. आणि आज याच परिसरातुन चार चाकी वाहन चोरीला गेले आहे.

या परिसरामध्ये सीसीटीव्ही लावण्याचे प्रमाणही अत्यंत कमी असल्याने पोलिसांना अशा घटनांच्या तपासामध्ये अडचणी येत आहेत. पोलीस प्रशासनाने सीसीटीव्ही लावण्याचे आवाहन करून सुद्धा नागरिक, व्यापाऱ्यांकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे चित्र आहे.