कटारिया महाविद्यालयाने केली घर घर तिरंगा उपक्रमाची जनजागृती, विद्यार्थिनींनी बांधल्या पोलीस बांधवांना राख्या

दौंड : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त येथील स्वर्गीय कि. गु.कटारिया महाविद्यालयाच्या वतीने घरघर तिरंगा उपक्रमाच्या जनजागृतीसाठी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. प्रभात फेरीमध्ये महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी, सेवक वृंद व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक हातात तिरंगा ध्वज घेऊन सहभागी झाले होते.

एकच नारा….. घर घर तिरंगा, वंदे मातरम अश्या घोषणांनी यावेळी परिसर दुमदुमला होता. प्रभात फेरीची सांगता दौंड पोलीस स्टेशन येथे करण्यात आली. आज राखी पौर्णिमेचा पवित्र दिवस असल्याने महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी पोलीस अधिकारी व पोलीस बांधवांना राख्या बांधल्या. याप्रसंगी पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी, राष्ट्रध्वज फडकविताना कोणती काळजी घ्यावी जेणेकरून राष्ट्रध्वजाचा अपमान होणार नाही याविषयी माहिती दिली. आमच्या प्रत्येक बहिणींनी अत्यंत निर्धारस्थपणे व आनंदाने जीवन जगावे व खूप शिकून आपल्या पालकांचे नाव उज्वल करावे, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असा आशीर्वाद यावेळी पोलीस बांधवांनी आपल्या बहिणींना दिला.

सदर उपक्रमासाठी भीमथडी शिक्षण संस्थेचे मानद सचिव प्रेमसुख कटारिया, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष समुद्र यांचे मार्गदर्शन लाभले. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. शरद गाडेकर यांनी आयोजन केले,प्रा. निलेश साखरे यांनी आभार मानले.