दौंड : दौंड तालुक्यातील वाटलुज गावामध्ये महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यास मारहाण झाल्याची घटना घडली आहे. दाऊद लाल मोहम्मद सय्यद असे मारहाणीमध्ये जखमी झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. तानाजी बाळासो शेंडगे (रा. वाटलुज, दौंड) याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणणे तसेच भा. द.वि. कलम 332,504,506 अन्वये दौंड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार दिनांक 29 जुलै रोजी महावितरण कंपनीचे कर्मचारी दाऊद सय्यद हे आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांबरोबर वाटलुज गावात लाईन फॉल्ट दुरुस्तीचे काम करण्यासाठी गेले होते. फिर्यादी व सहकारी कर्मचारी वाटलुज ग्रामपंचायत कार्यालयाजवळ थांबले असताना आरोपी तानाजी शेंडगे तेथे आला व तू माझ्या विरोधात पोलिसांकडे तक्रार का केली, तू आता येथे काम करायचे नाही असे म्हणत त्याने फिर्यादी कर्मचाऱ्यास शिवीगाळ केली व लाकडी दांडक्याने मारहाण करत पुन्हा या गावात काम करायचे नाही म्हणून त्याने फिर्यादीस पुन्हा दमदाटी व शिवीगाळ केली.
तानाजी बाळू शेंडगे यांनीही महावितरण कर्मचाऱ्याने त्यांना मारहाण केली असल्याची फिर्याद दौंड पोलिसात केली आहे, दौंड पोलिसांनी महावितरण कर्मचारी दाऊद सय्यद विरोधात मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी शेंडगे वस्ती रोडवर उभे होते, दाऊद तेथे आला असता त्यांनी त्याला विचारले की तू मला फोनवर शिवीगाळ का केली, त्यावर दाऊद याने फिर्यादीला शिवीगाळ करीत लोखंडी गजाने मारहाण केली असे फिर्यादित नमूद आहे.