अख्तर काझी –
दौंड : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार तरी कधी? असा प्रश्न सर्वच राजकीय पक्षांना सतावतो आहे. दौंड मध्ये तर रोजच्या गणीक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असणारे उमेदवार तर नव्याने वाढतच आहेत. अशा प्रत्येक इच्छुक उमेदवारांना नगरसेवक झाल्याची स्वप्न पडू लागली आहेत. हा प्रकार येथील सर्वच राजकीय पक्षांना डोकेदुखी ठरत आहे.
आपल्या प्रभागातील आपल्या समाजाचे प्रत्येक मत आपल्यालाच पडणार आणि म्हणून मी या प्रभागाचा प्रमुख दावेदार मीच असे या इच्छुकांना वाटत आहे. नगरसेवक पदाची निवडणूक म्हणजे यांना जणू एक खेळच आहे असे वाटत आहे. माझ्या मागे इतकी मते आहेत आणि निवडणूक लढविण्यासाठी लागणारे पैसे( लाखो रुपये) तर माझ्या घरात पडून आहेत, सगळं एकदम ओके मध्येच आहे माझे…. अशी भाषा आता हे गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असणारे महाभाग खुलेआम बोलू लागले आहेत.
शहरात नुसती नगरपालिका निवडणुकीवरच चर्चा झडताना पाहायला मिळत आहे. कधी एकदा निवडणुकीची तारीख जाहीर होते आणि कधी एकदाचा मी नगरसेवक होतो असे प्रत्येक उमेदवाराला येथे वाटू लागले आहे. आणि अशा इच्छुकांची मजा आता लोक घेऊ लागले आहेत. शहरातील इतर बाजारपेठेची वाट लागली आहे मात्र अशा परिस्थितीत शहरातील बिअर बार व हॉटेल वाल्यांची मात्र मजा होत आहे. रोज एक बाशिंग वाला बकरा या ठिकाणी हलाल होताना दिसतो आहे,
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील हॉटेलवाल्यांना मात्र अच्छे दिन आलेले दिसत आहे हे नक्की. कोणाच्या ध्यानीमनी नसलेला चेहरा अचानक व्हाट्सअप वर जळकतोय…… अमुक अमुक प्रभागातील प्रबळ उमेदवार म्हणून आणि त्यामुळे काय झाडी …. काय डोंगर …. काय हाटेल म्हणत शहरातील बेरोजगार युवा वर्गाचा मस्त टाइमपास (पेट पूजेसहित) चाललाय अशा इच्छुकांमुळे यात शंका नाही.