पुणे / यवत : महाविकास आघाडीतून (shivsena ncp Congress) बाहेर पडण्यासाठी महाराष्ट्रातून थेट गुजरात आणि नंतर आसामला गेलेल्या बंडखोर आमदारांना (shivsena mla) खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी चांगलेच धारेवर धरले आहे. तुम्ही ज्या महाराष्ट्राच्या काळ्या मातीतून निवडून आला त्या काळ्या आईला सोडून पळून गुवाहाटीला गेला आहात आणि आता तिथून काय बोलताय, तुम्ही महाराष्ट्रात तर या आणि मग काय करायचे ते करा असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी आज बंडखोर आमदारांना केले आहे. त्या संत तुकाराम पालखी सोहळ्यानिमित्त संत तुकोबांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी यवत येथे आल्या होत्या त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी सुप्रिया सुळे यांनी सर्व बंडखोर आमदारांना त्यांच्या कर्त्यव्याची जाणीव करून देताना, तुम्ही लोक तुमच्या विभागांचे आमदार आहात आणि सध्या पावसाळा सुरु आहे त्यामुळे प्रत्येक आमदाराच्या मतदार संघातील लोकांना येणाऱ्या अडीअडचणी त्या आमदाराने सोडविण्यासाठी तिथे फिल्डवर असायला हवे पण आपले मतदार संघ सोडून तिकडे फाईव्हस्टार हॉटेल्समध्ये ऐश करत काय बसलाय… निदान त्या लोकांचा तरी विचार करा ज्यांनी तुम्हाला निवडून दिले आहे. त्यांनी तुमच्याकडून काय अपेक्षा ठेवायच्या असा टोलाही त्यांनी बंडखोर आमदारांना लगावला आहे.
आसामला गेलेल्या आमदारांनी महाराष्ट्रातच राहून आपले बंड करायला हवे होते, त्यांना इथे महाराष्ट्रात बंड करण्यासापासून कोणी रोखले होते. मात्र या लोकांनी आसामला जाऊन बंड सुरु केले आहे. तिथे परिस्थिती अशी आहे की आज 100 लोक पुरात गेले आहेत. अनेकांची घरे तिथे उध्वस्त झाली आहेत त्यामुळे जर इथे राहून आपल्या मतदार संघातील लोकांची कामे तुम्हाला जमत नसतील तर किमान आसाम मधल्या लोकांची तरी तिथे मदत करा नुसती ऐश करत बसू नका असा मोलाचा सल्ला शेवटी खासदार सुप्रिया सुळे यांनी बंडखोर आमदारांना आज वारी निमित्ताने दिला आहे.