आता पुन्हा निवडून येऊन दाखवा! ‘बाळासाहेबांचे’ शिवसैनिक कधी ‘घाबरून’ किंवा ‘आमिषाला’ बळीपडून पळून जात नसतात – खासदार संजय राऊत

मुंबई : राज्यात (Maharashtra) सध्या राजकीय अस्थिरता निर्माण झाली असून एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्यासोबत जवळपास 40 आमदार (Shivsena Mla) असल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एकनाथ शिंदे यांसोबत गेलेल्या आमदारांबाबत मोठे विधान केले असून आता पुन्हा तुम्ही निवडून येऊन दाखवा, बाळासाहेबांचे शिवसैनिक कधी घाबरून किंवा आमिषाला बळीपडून पळून जात नसतात तर आलेल्या संकटाचा सामना करत असतात त्यामुळे जे गेले ते पार्टी नसून काल वर्षा बंगल्यापासून ते मातोश्रीपर्यंत जे रस्त्यावर उतरले होते ते खरे शिवसैनिक आणि शिवसेना पार्टी असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

माध्यमांशी पुढे बोलताना त्यांनी, पार्टी वेगळी आहे आणि आमदार वेगळे आहेत. हे आमदार कोणत्या आमिषाला बळी पडले, कोणत्या दबावाखाली आले, इडी ला घाबरून गेले का या सर्व बाबींचा खुलासा लवकरच होणार आहे असे सांगत आज दुपारी शिवसेना आमदार कैलास पाटील, नितीन देशमुख हे पत्रकार परिषद घेऊन काही गोष्टींचा भांडाफोड करतील याची माहिती त्यांनी दिली.

शिवसेनेवर एकनाथ शिंदे आपला हक्क सांगणार आहेत या प्रश्नावर बोलताना त्यांनी, त्या लोकांनी काय करायचे ते त्यांचा प्रश्न आहे मी आमच्या पार्टीबद्दल बोलतोय आणि आमची पार्टी काल वर्षा बंगल्यापासून ते मातोश्री पर्यंत सर्वांनी पाहिली आहे. काल रस्त्यावर उतरलेले शिवसैनिक हि आमची खरी पार्टी आहे. आजही लाखो कार्यकर्ते, शिवसैनिक आमच्यासोबत म्हणजे शिवसेनेसोबत असून गेलेल्या आमदारांनी पुन्हा निवडून येऊन दाखवावे असा इशाराही खासदार संजय राऊत यांनी यावेळी दिला आहे.

काही आमदार आमची पार्टी सोडून जाने म्हणजे पार्टी तुटली असा त्याचा अर्थ होत नाही. आमच्या संपर्कात सध्या 20 आमदार आहेत आणि ते ज्यावेळी मुंबईत येतील त्यावेळी सर्व खुलासा होईल त्यामुळे मी बिनधास्त आहे आणि माझ्या चेहऱ्यावर कुठलाही तणाव तुम्हाला दिसत नसेल याचे कारण म्हणजे संकटांना तोंड देण्याची आम्हाला सवय असून आम्ही बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांना मानणारे लोक आहोत त्यामुळे येणाऱ्या संकटाना तोंड द्यायची आमची तयारी असते असेही त्यांनी म्हटले आहे.