पुणे : जेवणाच्या टेबलवर जेवत असताना किरकोळ वादातून मांजरीच्या माजी सरपंचांवार गोळीबार करून डोक्यात दगड घालण्याय आल्याची गंभीर घटना रात्री घडली आहे. याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात नंदू शेडगे, चंद्रकांत घुले, व अन्य तिघांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार माजी सरपंच पुरुषोत्तम धारवाडकर हे हॉटेल श्रीराम येथे आपल्या मित्रांसह जेवण करायला गेले होते. त्यावेळी चंद्रकांत घुले यासोबत त्याच टेबलवर बसलेल्या संजय झुरंगे याचे भांडण झाले. मात्र या भांडणाचा आणि धारवाडकर
यांचे काही देणेघेणे नव्हते.
भांडणे झाल्यानंतर चंद्रकांत घुले याने आपल्या साथीदारांना फोन करुन घटनास्थळी बोलावून घेतले होते. त्यानंतर धारवाडकर हे आपले जेवण आटोपून हॉटेलमधून बाहेर निघत असताना तेथे दुचाकीवर तीनजण आले आणि त्यातील एकाने चित्रपटात दाखवतात त्या फिल्मीस्टाईलने धारवाडकर यांच्या
दिशेने गोळी झाडली. केवळ नशीब बलवत्तर म्हणून ती गोळी धारवाडकर यांना न लागता बाजूने निघून गेली. यानंतर हल्लेखोरांनी तेथे
पडलेले दगड, विटा घेऊन धारवाडकर यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यामध्ये त्यांच्या डोक्याड दगडाचा वर्मी घाव बसल्याने ते गंभीर जखमी झाले.
यावेळी आरोपी हे दहशत निर्माण करून आमच्या नादी कोणी लागले तर अशीच गत करु, कुणी वाचवायला मधी यायचे नाही असे ओरडून सांगत तेथून पसार झाले. धारवडकर यांना गंभीर मार लागल्याने त्यांना लागलीच जवळील खाजगी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात येऊन त्यांच्यावर उपचार करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती मिळत असून या घटनेचा अधिक तपास हडपसर पोलीस करीत आहेत.