नगर परिषद, नगरपंचायत कर्मचाऱ्यांचे 2 मे पासून राज्यव्यापी कामबंद आंदोलन!

दौंड : महाराष्ट्रातील नगरपरिषद व नगरपंचायत मधील कार्यरत संवर्ग व नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी संघर्ष समिती च्या वतीने दि.2 मे 2022 पासून राज्यव्यापी कामबंद आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला आहे. संघर्ष समितीच्या वतीने काम बंद आंदोलनाचे निवेदन दौंडच्या मुख्याधिकारी निर्मला राशिनकर यांना देण्यात आले. यावेळी दौंड नगरपालिकेतील पदाधिकारी सुप्रिया गुरव, जिजाबा दिवेकर,शाहू पाटील,हनुमंत गुंड, स्मिता मस्के, तृप्ती साळुंखे, सिद्धिविनायक नलगे, शिरसागर, वाणी तसेच विठ्ठल सोनवणे उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायती मध्ये कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री व नगर विकास खात्याचे प्रधान सचिव यांच्यासमवेत दि.11/8/2017 व 24/8/2017 तसेच आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय( मुंबई) यांच्या समवेत दिनांक 1/9/2019 रोजी बैठक झालेली होती. बैठकीमध्ये नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात सविस्तर चर्चा होऊन तातडीने मागण्या मान्य करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे सुचित करण्यात आले होते. तथापि बऱ्याच मागण्यांवर निर्णय घेण्यात आलेला नाही. मागणी केलेल्या मागण्या या वस्तुस्थितीस धरून असल्याने नगरपरिषद कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याची कर्मचाऱ्यांची भावना आहे. या सर्व परिस्थितीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व त्यावर त्वरित निर्णय होण्यासाठी दि.2/5/2022 पासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येत आहे असे निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे.