ड्रग्स प्रकरणातील पंच प्रभाकर साईलचा मृत्यू संशयास्पद! चौकशीचे आदेश : गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

मुंबई : मुंबई क्रूझ छापा आणि आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात मोठा गौप्यस्फोट करणारा पंच प्रभाकर साईल याचा अचानक मृत्यू झाल्याने एकच खळबळ माजली आहे. याच पार्श्वभूमीवर आता राज्याचे गृहमंत्री दिलीस वळसे-पाटील यांनीही प्रभाकर साईल याचा अचानक मृत्यू हा संशयास्पद असून त्याची चौकशी करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.
यावेळी राज्याच्या गृहमंत्र्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना, प्रभाकर साईलच्या मृत्यूमुळे संशयास्पद परिस्थिती निर्माण झाली असल्याने या मृत्यूच्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पोलीस महासंचालकांना देण्यात आल्याचे सांगितले.
ज्यावेळी एनसीबीने क्रूझ शिपवर छापा मारून आर्यन खान व अन्य आरोपींकडे सापडलेल्या ड्रग्जचा पंचनामा केला होता. त्यावेळी प्रभाकर साईल हा त्याठिकाणी पंच म्हणून उपस्थित होता. मात्र, त्या नंतर काळात प्रभाकर साईल याने एनसीबी चे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करताना या प्रकरणात आर्यन खान याला गोवण्यात आल्याचे व आर्यन खान याला सोडवण्यासाठी किरण गोसावी याने शाहरुख खानकडे खंडणी मागितल्याचा आरोप केला होता.