पुणे / दौंड : पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये ऊस शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. उसाचे रोख पैसे मिळून आर्थिक अडचण दूर व्हावी म्हणून अनेक शेतकरी आपला ऊस गुऱ्हाळावर देतात. मात्र शेतकऱ्यांची हिच अडचण हेरून आता फसवणूक करणाऱ्या दलालांनी आपला डोळा ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर आणि त्यांच्या ऊस पिकावर केंद्रित केल्याचे दिसत आहे.
हे फसवणूक करणारे दलाल अगोदर ज्याचा ऊस तोडायला आला आहे त्या शेतकऱ्याला गाठतात, नंतर त्याला बाजारभावापेक्षा पन्नास-शंभर रुपये जास्त देऊ, काटा पेमेंट करु, रोख पैसे देऊ असे आमिष दाखवतात. शेतकरी बिचारा आर्थिक अडचणींमुळे रोख पैसे मिळतील, थोडीफार अडचण दूर होईल या आशेने दलालांच्या जाळ्यात ओढला जातो. मात्र त्याचा ऊस एकदा का त्या दलालांनी तोडून नेला की मात्र ते दलाल त्याला शोधूनही सापडत नाहीत. आणि त्यांनी दिलेले चेक कधी वटतही नाहीत. यातून जर त्या शेतकऱ्याने आम्ही पोलिसांना सांगू असे म्हटले तर त्याला धमक्या दिल्या जात असल्याचे प्रकार सध्या दौंड, बारामती व इतर तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत सुरु आहेत. विशेष बाब म्हणजे शेतकऱ्यांचा ऊस घेऊन जाणारी दलालांची टोळी ही गुऱ्हाळघरांचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या दौंड तालुक्यातील असून ती दौंडसह आसपासच्या तालुक्यामध्ये सक्रिय आहे.
ऊस शेती करत असताना शेतकऱ्यांना विविध आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते हे सर्वश्रुत आहे. मात्र त्यातून मार्ग काढत काढत हा शेतकरी आज ना उद्या आपल्या उसाचे पैसे होतील आणि त्यातून आपल्या अडचणी दूर होतील या आशेवर स्वतःच्या पोटाला मारून, बायकांच्या गळयातील सोन्याचे दागदागिने गहाण ठेऊनहा शेतकरी ऊसाचे पिक घेत असतो. मात्र इतक्या हाल अपेष्टा सहन करून उसपीक घेणाऱ्या शेतकऱ्यांवर गिधाडासारखी नजर ठेऊन असलेले हे दलाल शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक करतात आणि उलट शेतकऱ्यांनाच ‘जर तुम्ही पोलिसांत गेला तर पैसेही देणार नाही आणि पोलीस यंत्रणा मॅनेज करून तुम्हालाच त्रास देईल’ अशी धमकी देत असल्याचे समोर येत आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फसविण्याचे प्रकार सध्या दौंड, बारामती आणि आसपासच्या असलेल्या तालुक्यात घडत असून या सर्वांना फसवणारी टोळी हि दौंड तालुक्यातील असल्याचे पुढे येत आहे. पोलिसांनी या टोळीचा वेळीच बिमोड करणे गरजेचे बनले असून या टोळीच्या आर्थिक फसवणूकीतून एखादा शेतकरी स्वतःचे बरे वाईट करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अशाच काही फसवणूक करणाऱ्या टोळ्यांवर दौंड आणि यवत पोलीस ठाण्यात या अगोदरही गुन्हे दाखल झाले असून पोलिसांनी वेळीच अश्या दलालांच्या मुसक्या आवळल्यास या दलालांकडून होणारी संभाव्य फसवणूक रोखता येईल यात शंका नाही.