दौंड / केडगाव : दौंड तालुक्यातील सर्वात मोठे उलढालीचे गाव कम शहर असणाऱ्या केडगावच्या ग्रामपंचायतीचे सरपंच अजित शेलार पाटील यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. अजित शेलार हे लोकमतातून पाच वर्षांसाठी सरपंच म्हणून निवडून आले होते. त्यांचा अजून साधारण दोन ते तीन वर्षांचा कार्यकाळ बाकी असताना त्यांनी राजीनामा दिल्याने केडगावमध्ये उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे.
याबाबत अजित शेलार यांनी आपल्या अधिकृत फेसबुक अकाउंटवरून ही माहिती दिली असून याबाबत त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. अजित शेलार हे शांत, सय्यमी स्वभावाचे म्हणून ओळखले जातात. त्यांना अंतर्गत राजकीय दबावाचा मोठा सामना करावा लागत असल्याच्या चर्चाही मध्यंतरी होत होत्या. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी बोलावलेल्या ग्रामसभाही अनेकवेळा तहकूब झाल्याने त्यांना टार्गेट करण्यात येत असल्याची चर्चाही होत होती.
त्यांची पोस्ट पडल्यानंतर अनेकांच्या कमेंट येत असून या राजीनाम्याचे नेमके कारण काय असेल याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.